
ठाणे : समाजातील नागरिकांचे ठाणे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ग्रीन कल्चर, ठाणे यांच्या सहकार्याने महिला नगरसेविकांना इनडोअर प्लान्टचे वाटप करण्यात आले. यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर भव्य स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन न करता प्रतिनिधीक स्वरुपात कोरोना नियमांचे पालन करीत महापौर दालनातच छोटेखानी कार्यक्रम करण्यात आले असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
8 मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र भव्य स्वरुपात साजरा करण्यात येतो. दरवर्षी हा कार्यक्रम राम गणेश गडकरी रंगायतन येथे कर्मचाऱ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. परंतु कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यक्रमांवर बंधने आल्यामुळे ही परंपरा खंडीत न करता अत्यंत साधेपणाने व छोटेखानी स्वरुपात हा कार्यक्रम महापौर दालनात केला असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, ग्रीन कल्चर नर्सरी ठाणेचे तुषार शेटे, नाजमीन शेख, वैभव पागीरे आदी उपस्थित होते.
यावेळी ठाणे महापालिकेच्या पाच विशेष समित्यांच्या सभापती व नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात आले. यंदा प्रथमच सर्वच समित्यांवर 90 टक्के महिलांचे वर्चस्व आहे, त्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती निशा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, लोकमान्य सावरकरनगर् प्रभागसमिती अध्यक्षा आशा डोंगरे, वर्तकनगर प्रभागसमिती अध्यक्षा राधिका फाटक, उथळसर प्रभागसमिती अध्यक्षा वहिदा मु्स्तफा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनिता मुंडे यांना महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक दशरथ पालांडे नगरसेविका कमल चौधरी, अर्चना मणेरा, वनिता घोगरे, कविता पाटील, सुलोचना पाटील आदी उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाण्यातील समस्त महिला वर्गास शुभेच्छा दिल्या.