Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोपर्डी निकाल: तिघाही नराधमांना फाशी!

कोपर्डी निकाल: तिघाही नराधमांना फाशी!

अहमदनगर: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीशांनी अवघ्या काही मिनिटांतच शिक्षेची सुनावणी केली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी अशी इच्छा पीडितेच्या आईने केली. निकालाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील उपस्थित नव्हते.

 

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. निकम म्हणाले की, मुख्य आरोपीसह बलात्काराचा कट रचणाऱ्या दोघांना न्यायालयाने मृत्यूदंडांची शिक्षा सुनावली. या दोषींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मुख्य आरोपी पप्पू बाबूलाल शिंदे याला बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. आरोपी संतोष भवाळ याने न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण केल्यामुळे त्याला १८ हजार रुपये दंड सुनावण्यात आला होता. त्याने अद्यापही ही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम महसुलीची थकबाकी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी क्रमांक १ जितेंद्र शिंदे, आरोपी क्र. २ संतोष भवाळ आणि आरोपी क्र. ३ नितीन भैलुमे यांना खून आणि बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावली. आरोपी एकला पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा, बलात्कार केल्यामुळे जन्मठेप आणि २० हजार रूपये दंड. आरोपी २ व ३ यांनी बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. आरोपी एकला खून आणि बलात्कारप्रकरणी फाशी, बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी फाशी, आरोपीने दोनने खर्च भरला नाही त्यामुळे १८ हजार रूपये नगर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा, असे आदेश दिलेत.

कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान तिन्ही आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेता येईल. तिथे त्यांना वकीलही मिळेल.

दरम्यान, न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले होते पण कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नव्हता. पोलीस प्रमुखांनीही सकाळी सुरक्षेचा आढावा घेतला होता.

गेल्या आठवड्यात भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले होते.

बचावपक्षाने केलेला युक्तिवाद
शिंदे याच्यावतीने वकील योहान मकासरे व भैलुमेच्यावतीने वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद करताना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. आरोपी निर्दोष आहेत, खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, १२० ब (कट कारस्थान रचणे) व १०९ (गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे) हे कलम लागूच होत नाही. भैलुमे हा सराईत गुन्हेगार नाही, पूर्वी त्याच्यावर गुन्हेही दाखल नाहीत. तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. तो दलित आहे. कुटुंबाचा आधार आहे. त्याची आई आजारी असते. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वडील मजुरी करतात. त्यामुळे कमीत कमी शिक्षा करावी, असा युक्तीवाद आरोपीचे वकील आहेर यांनी केला. शिंदे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील मकासरे यांनी, ही घटना दुर्मिळात दुर्मीळ नाही, आरोपी तरुण आहे, गुन्हेगार नाही. त्याला पत्नी आहे, असे सांगत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती.

या कलमांखाली ठरवले होते दोषी
न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (हत्या), ३७६- २ ब (बलात्कार करुन जखमी करणे), १२० ब (फौजदारी स्वरुपाचा कट रचणे), १०९ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे), ३५४ (छेड काढणे), बालंकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६, ८, १६ अन्वये दोषी ठरवण्यात आले.

माझ्या छकुलीला न्याय मिळाला!आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावना कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने व्यक्त केली. यावेळी त्यांनी तपास अधिकारी, न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि समाजाचे आभार मानले. ‘शाळेतील लहान लहान मुलांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. आज त्या मुलांच्या ताईला न्याय मिळाला,’ या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यापुढे असा अत्याचार कोणावरही होऊ नये, असेही त्या म्हणाल्या. ‘पोलिसांनी अतिशय मनापासून या घटनेचा तपास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments