लोकल ‘लाइफ लाइन’ नव्हे ‘डेथलाइन’!

- Advertisement -

महत्वाचे….
१.दररोज लोकलमधून सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात.
२.जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे.
३.तांत्रिक बिघाड, अन्य कारणास्तव उशिराने धावणा-या ट्रेन, अरुंद पूल अपघातास कारणीभूत


मुंबई : घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत पळणा-या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. दररोज लोकलमधून सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. गेल्या वर्षभरात लोकलने प्रवास करणा-या तब्बल हजार १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, जवळपास हजार ३४५ प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत.

लोहमार्ग पोलिसांकडून जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीतील रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू आणि अपघातांची आकडेवारी नुसार, गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवर १हजार ९२८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व १८०५ प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करताना १ हजार ८६ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर १५०४ प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात ३हजार १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३ हजार ३४५ प्रवासी अपघातात जखमी झाले.
हार्बर मार्गावर वर्षभरात झालेल्या विविध अपघातांत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ४७ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे वडाळा रोड स्थानकात घडले आहेत. याच कालावधीत मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात २९२ प्रवाशांचा अपघात झाला असून, यात १३७प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी स्थानकात गेल्या वर्षभरात २२० अपघात घडले असून, यात ७० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १५० प्रवासी जखमी झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. माहिती अधिकार कार्येकर्ते समीर झव्हेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली.
रेल्वे प्रशासन रूळ ओलांडू नका, लटकून प्रवास करू नका, अशा सूचना वारंवार देत असते, परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बहुतांशी अपघात घडतात, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर तांत्रिक बिघाड, अन्य कारणास्तव उशिराने धावणा-या ट्रेन, अरुंद पूल आदी अनेक समस्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

ठाणे स्थानकात सर्वाधिक मृत्यू….
१३७ प्रवाशांचा गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात अपघाती मृत्यू झाला असून १५५ प्रवासी जखमी झाले आहेत.
७० प्रवाशांचा गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात अपघाती मृत्यू झाला असून, १५० प्रवासी जखमी झाले आहेत.
२२ प्रवाशांचा गेल्या वर्षभरात हार्बर मार्गावरून प्रवास करताना मृत्यू झाला असून, ४७ प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisement -