लॉटरी व्यापाऱ्याच्या मुलाची १ कोटींसाठी हत्या?

- Advertisement -

नागपूर: एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांच्या मुलाचे म्हणजेच राहुल आग्रेकरचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता बुटीबोरी येथील पेटचुहा येथील रामा डॅमजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला. रस्त्याने जात असलेल्या मजुरांनी जळत असलेला मृतदेह पाहून बुटीबोरी पोलिसांना सूचना दिली होती. हा मृतदेह राहुलचाच असल्याचं वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झालं आहे. राहुलचं दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांनी अपहरण केलं असून ते फरार झाले आहेत.

मंगळवारी सकाळी सेंट्रल एव्हेन्यू येथील दारोडकर चौकातून ३२ वर्षीय राहुलचे अपहरण करण्यात आले होते. राहुल सकाळी साडेआठ वाजता एक ते दीड तासात परत येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. तो घरून पायीच निघाला होता. काही दूर अंतरावर दारोडकर चौकात दुर्गेश आणि पंकज बोलेरो गाडीत त्याची वाट पाहात होते. राहुल त्यांच्यासोबत गाडीत बसून रवाना झाला होता. सकाळी ११.३० वाजता त्याने पत्नी अर्पिताला फोन करून एक ते दीड तासात परत येतो असे सांगितले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राहुलच्या मोबाईलवरून त्याचा मोठा भाऊ जयेश यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी फोन आला. तेव्हा राहुलचे अपहरण झाल्याचे कुटुंबियांना कळले.

खंडणीच्या फोनने घाबरलेल्या राहुलच्या कुटुंबीयांनी दुपारी चार वाजता लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांना राहुलच्या मोबाईलवरून पुन्हा खंडणीसाठी फोन आला. लकडगंज पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. संध्याकाळी ७ वाजता अपहरणकर्त्यांनी तिसऱ्यांदा फोन केला आणि एक कोटी रुपये घेऊन कोराडीतील जगदंबा मंदिराजवळ या असं सांगितलं. रात्री ११ वाजता पुन्हा फोन करू असे सांगून मोबाईल बंद केला होता. तेव्हापासून राहुलचा मोबाईल बंदच होता

- Advertisement -

पोलिसांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स सर्व्हिलन्सद्वारे पंकज, आरोपी दुर्गेश आणि प्रशांत हे दुपारी जवळपास सव्वादोन वाजता बुटीबोरीमध्ये असल्याची माहिती मिळाली. या आधारावर शहर पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांशी संपर्क साधला. हा मृतदेह राहुलचा असल्याचा असण्याची शक्‍यता लक्षात घेता पोलीस राहुलच्या लॉटरी कार्यालयातील कर्मचारी व मित्रांना जळालेला मृतदेह दाखवला. यावेळी मृतदेहाजवळ सापडलेला चाव्याचा गुच्छा, बेल्ट, पर्स, ब्रांडेड जिन्सच्या आधारावर मृतदेह राहुलचा असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते.

- Advertisement -