राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; सरकारसमोर उत्पन्न वाढीचं आव्हान

- Advertisement -
maharashtra-budget-2021-update-ajit-pawar-is-going-to-present-state-budget-for-2021-22
maharashtra-budget-2021-update-ajit-pawar-is-going-to-present-state-budget-for-2021-22

मुंबई : आज सुमारे एक लाख कोटींच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार (८ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर  होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मागील वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी ९ हजार ५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. करोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच राज्यातील जनतेला आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा असल्याने सरकार अपेक्षापूर्ती करणार का? याकडेही लक्ष लागलेलं आहे.

पेट्रोल-डिझेल दरात सवलत?

- Advertisement -

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने 2018 साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे.

सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट आणि सेस आकारला जातो. पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आणि 10.20 रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट आणि 3 रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये दुष्काळ सेसचाही समावेश आहे. महिला दिनी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने महिलांसाठी काही विशेष घोषणा असणार का याकडे देखील लक्ष असणार आहे.

- Advertisement -