Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे म्हणाले,कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच

उद्धव ठाकरे म्हणाले,कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच

मुंबई: कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला. “आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो.

दादरला शिवाजी पार्कला जिथे घर होतं तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात-आठ वर्षांचा होतो. गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. पंढरीनाथ सावंत अश्रूधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले होते. आम्ही अडीच तीन वाजता घरी निघाल्यानंतर गाडीत बाळासाहेब, माँ आणि मी होतो. बाळासाहेबांनी आमची बॅग भरुन ठेवा, उद्या बहुतेक सुर्योदयाच्या आधी आमची उलचबांगडी होणार सांगितलं आणि तसंच झालं,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

“पुढची १० दिवस मुंबई धगधगत होती. आज आपल्याला तीच धग पुन्हा जागवायची आहे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. “हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो…मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचं दुमत नसतं. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असं एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. “जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

 “माझ्याकडे अनेकजण आमच्यासाठी तिथे मराठी शाळा सुरु करण्याची मागणी करतात. हरत नाही…एकदा आल्यानंतर तुम्ही आमचेच आहात. कर्नाटकनेही कधी केलं नसेल एवढं मोठं काम तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. नावाप्रमाणेच ते ‘बेलगाम’ वागत आहेत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी कोर्टात केली पाहिजे. कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“महाराष्ट्र एकीकरण समितीला आपण कुठेही अपशकून करायचा नाही म्हणून आम्ही सुरुवातीला तिथे शिवेसना, मार्मिकदेखील येऊ देत नव्हतो. मराठी माणसासाठी एकजूट कायम राहावी अशी इच्छा होती. पण आज आपणच पायावर धोंडा मारुन घेतला आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments