Thursday, March 28, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी आवाहन

औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी आवाहन

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2019 जाहीर झाली असून मतदान 19 ऑगस्ट रोजी तर मतमोजणी 22 ऑगस्ट, 2019 रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र मिळविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघात निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. ही प्राधिकार पत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या इच्छूक प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या नावाच्या शिफारशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे वेळेत पाठवावयाची आहे. या शिफारशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात 30 जुलै 2019 पर्यंत पाठविण्यात येणार आहेत.

प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या या निवडणूकीकरीता प्राधिकार पत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या दोन प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकार पत्रे हवी असल्यास तीन प्रतीसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 30 जुलै, 2019 पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेली प्राधिकार पत्राची मागणी स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments