Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमराठवाडालातूरनरेंद्र मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी

नरेंद्र मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी

Narendra Modi destroyed the youth and the farmersलातूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लातूरमधील औसा येथे प्रचारसभा घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. आत्महत्या आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन त्यांनी सरकारला चांगलंच घेरलं. मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्याचाही गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी आज रविवारपासून प्रचाराला सुरुवात केली. मराठवाड्यातील लातूल जिल्ह्यातील औसा मतदारसंघात राहुल गांधींनी सरकारवर जोरदार प्रहार केला. राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवातच उपस्थितांना रोजगार आहे का, शेतीमालाला भाव मिळतो आहे का आणि अच्छे दिन आले का? असे प्रश्न करत केली. या सर्वच प्रश्नांना उपस्थितांनी नाही म्हणत प्रतिसाद दिला. औसा मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील आणि भाजपचे अभिमन्यू पवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना विचारलं तर ते मोदींनी उद्ध्वस्त केल्याचं सांगत आहेत. मात्र, माध्यमं याविषयी काहीच बोलत नाही. माध्यमं मोदींचं गुणगान करत आहेत. दुसरीकडं हीच माध्यमं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. गुजरातमध्ये कपडे आणि हिऱ्यांचा व्यवसाय संपला आहे. मोदींनी माध्यमांचे मालक असणाऱ्या अंबानी, अडाणी यांच्यासारख्या 10 ते 15 उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटी रुपये कर्ज माफ केले. मनरेगा चालवण्यासाठी 35 हजार कोटी रुपये लागतात. मोदींनी केवळ 15 लोकांना साडेपाच लाख कोटी मागील काळात दिले.”

शेतकऱ्याचं छोटंसं कर्ज थकलं तरी त्याला तुरुंगात टाकलं जातं. मात्र देशातील श्रीमंत लोक त्यांचं कर्ज फेडत नाहीत. त्याला सरकार ‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट’ म्हणतं. असं म्हणत पुन्हा याच कर्जबुडव्यांना बँकेचे दरवाजे खुले केले जातात, असाही आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

नोटबंदी आणि जीएसटी फक्त गरिबाच्या खिशातील पैसे काढण्यासाठीच…

राहुल गांधी म्हणाले, “देशातील गरीब लोकांच्या खिशातील पैसे काढून श्रीमंतांच्या खिशात घालणं हाच नोटबंदी आणि जीएसटीचा हेतू होता. म्हणूनच नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला. अनेक लोकं स्वतःचे पैसे काढण्यासाठी उन्हातान्हात रांगेत उभे होते. मात्र, तिकडे नीरव मोदी आणि इतर उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले. मोदींच्या निर्णयाने देशातील छोटे उद्योजकांचा सत्यानाश केला. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत.” असा घणाघात केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments