होम महाराष्ट्र मराठवाडा सुधाकर शृंगारे यांचा जनसंपर्क अभियानावर भर

सुधाकर शृंगारे यांचा जनसंपर्क अभियानावर भर

पदयात्रा व कॉर्नर बैठकांमधुन जनतेशी थेट संपर्क उदगीर : लातूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी प्रचाराच्या निमित्ताने जळकोट तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी श्रृंगारे यांच्या पदयात्रा व कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या दौर्‍यात सुधाकर श्रृंगारे यांनी जगळपुर, हावरगा, उमरगा, पाटोदा, चेरा, रावनकोला, धामणगाव, वांजरवाडा, माळहिप्परगा, गुत्ती, घोणसी, बोरगाव, कोळनूर, सुल्लाळी, अतनूर, गव्हाण, शेलदारा, केकतसिंदगी, चाटेवाडी, रामपूर तांडा या गावांना भेटी दिल्या. या गावातील मतदारांशी संवाद साधून सुधाकर श्रृंगारे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत आ. सुधाकर भालेराव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार नळंदवार, जिल्हा परिषद सदस्य राहुल केंद्रे, माजी जि. प. सदस्य चंदन पाटील, सोमेश्वर सोप्पा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेदवार सुधाकर श्रृंगारे म्हणाले, ही निवडणूक राष्ट्रहितासाठी महत्वाची आहे. लोकसभेच्या माध्यमातून आपण या भागाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून देशात नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा येणे ही काळाची गरज आहे. नरेंद्र मोदींचे हात बळकट करून मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहनही यावेळी सुधाकर श्रृंगारे यांनी मतदारांना केले.

गावोगावी पदयात्रा, कॉर्नर बैठकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुधाकर श्रृंगारे यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला आहे.