नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी अर्थव्यवस्थेचे वाटोळे केलेः मोहन प्रकाश

- Advertisement -

सांगली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.

ते सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजीत जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, नसीम खान, हर्षवर्धन पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहन प्रकाश

- Advertisement -

भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. यवतमाळमध्ये २५ शेतक-यांचा फवारणी करताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर नाचत असून,मोदी आणि जेटलींनी देश विकण्याचे काम सुरु केले आहे, असा घणाघाती आरोप मोहन प्रकाश यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. काळा पैसा आणू म्हणणाऱ्या आणि १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करणा-यांनी किमान १५ हजार रुपयांची तरी मनीऑर्डर करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.

भुपिंदरसिंग हुडा

भाजपचे सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. युपीए सरकारच्या काळात समाधानी असणारा शेतकरी आज दुःखात आहे. शेतक-यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. धानाला भाव नाही मात्र तांदळाचे भाव वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ५० टक्क्याने कमी झाले आहेत देशात मात्र इंधनाचे दर वाढतच आहेत. तेलाचे दर वाढवून सरकारने ३ लाख कोटी रूपये कमावले आहेत. मोदी सरकार गरिबविरोधी आहे. निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेवर येताच शिफारशी लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. युपीए सरकारच्या काळात हमीभावात दरवर्षी सरासरी १५ टक्के वाढ केली जायची या सरकारच्या काळात ४ टक्के ही वाढ नाही. नोटाबंदीमुळे देशातील उद्योगांना बसला असून उत्पादन घटले चीनमधून होणारी आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीचा खरा फायदा चीनलाच झाला आहे. देशभरात सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण असून जनआक्रोश मेळाव्याला जमलेला हा जसमुदाय परिवर्तनाचा संकेत आहे असे हुडा म्हणाले.

खा. अशोकराव चव्हाण

राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकार कसे चालवतात हे भाजपच्या लोकांना कळत नाही. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. फसव्या घोषणा करणे आणि खोट्या जाहिराती देणे एवढेच काम या सरकारने केले आहे. राज्यातील शेतक-यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ असे सांगितले. प्रत्यक्षात कर्जमाफीचा आकडा ५ ते ६ हजार कोटींच्या पुढे जाईल असे दिसत नाही. सरकारने बुलेट ट्रेनला २५ हजार कोटी रूपये दिले पण कर्जमाफीचे पैसे द्यायला टाळाटाळ करित आहे. अटी व शर्ती घालून शेतक-यांना वगळले जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफीसाठी फक्त एक जीआर काढला आणि कर्जमाफी झाली गेल्या चार महिन्यात सरकारने २५ जीआर काढले पण कर्जमाफीची काही मिळाली नाही. हे शेतकरी विरोधी सरकार फार दिवस सत्तेत राहणे राज्याच्या हिताचे नाही. शिवसेनेत स्वाभिमान शिल्लक असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. काँग्रेसने या सरकारविरोधात संघर्ष सुरु केला असून या सरकारला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय हा संघर्ष थांबवणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे माजी मंत्री पतंगराव कदम यांची भाषणे झाली.

- Advertisement -