Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदी २०१९ साली पंतप्रधान झाल्यास देशाचं आणखी वाटोळं होईल : केतकर

नरेंद्र मोदी २०१९ साली पंतप्रधान झाल्यास देशाचं आणखी वाटोळं होईल : केतकर

Kumar ketkar

मुंबई : ‘२०१९ साली नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं खूपच वाटोळं होईल.अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. एबीपी माझा वृत्तवाहीवरील माझा कट्टावर बोलत होते.

मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचं खूपच वाटोळं होईल
२०१३  सालीच मी मत मांडलं होतं की, मोदी पंतप्रधान झाले तर देशाचं वाटोळं होईल. आता मला असं वाटतं की, २०१९ साली मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं आणखी वाटोळं होईल. आताही देशाचं खूपच वाटोळं म्हणजे खूपच वाटोळं झालं आहे. त्यांचं कारण म्हणजे  मला कधीही वाटलं नव्हतं की, बीफ, लव्ह जिहाद यासारख्या विषयांवर कधी एवढी चर्चा होईल. पण मोदी सरकार आल्यानंतर या विषयांवर चर्चा सुरु झाली. त्यामुळे देशातील वातावरण बिघडलं.’ अशी टीका यावेळी कुमार केतकर यांनी केली.

मोदींच्या लोकप्रियतेत घसरण
२०१४ साली मोदी निवडून आल्यानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. २०१४ साली त्यांची लोकप्रियता अत्युच्च स्तरावर होती. पण आता गेल्या वर्षभरापासून त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड घट होत आहे. याला मीडिया काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण मीडियामुळे समाजात या प्रतिमा निर्माण होतात.’

त्यावेळी लोकांनी अटलबिहारींनाही नाकारलं होतं
‘अटलबिहारीचं सरकार असताना २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण त्याचवेळी लोकांनी वाजपेयींना नाकारलं आणि काँग्रेसच्या हातात सत्ता सोपावली. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं अशी मागणीही तेव्हा सर्वांनी केली. पण त्यावेळी सोनियांनी पंतप्रधान पद नाकारलं. त्यामुळे राजकारणात बदल हे होतच असतात.’ असंही केतकर यावेळी म्हणाले.

मला बाळासाहेबांनी खासदारकीची थेट ऑफर दिली होती
‘राज्यसभेची खासदारकी स्वीकारताना माझ्या मनाची कधीही ओढाताण झाली नाही. याच्या आधीही मला काँग्रेसची दोनदा खासदारकीची ऑफर आली होती. एकदा २००८ साली आणि दुसऱ्यांदा २०१२ साली. तेव्हा मी लोकसत्तेचा मुख्य संपादक होतो. त्याच्याही आधी मला एकदा ऑफर आली होती. तेव्हाही मी नाहीच म्हटलं होतं. ती शिवसेनेची ऑफर होती. ती थेट बाळासाहेबांनीच दिली होती. त्यावेळेस माझ्या डोक्यात तसा काही विचारही नव्हता. तेव्हा मी बाळासाहेबांना ताबडतोब नकार दिला होता.’ असा गौप्यस्फोटही केतकरांनी केला.

वाटलं नव्हतं की, मला खासदारकीची ऑफर येईल
‘राहुल गांधी जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, मी यापुढे तरुणांना प्राधान्य देणार. त्यामुळे तेव्हा मला वाटलं नव्हतं की, मला खासदारकीची ऑफर येईल. पण त्यानंतर मला अचानक खासदारकीची ऑफर आली. पण मी त्यांना तात्काळ माझा होकार कळवला नाही. दोन तास विचार करुन मी त्यांना माझा निर्णय सांगितला.’ असं केतकर म्हणाले.

ट्रोलिंगचा प्रकार नसल्यापासून माझ्यावर टीका…
‘जेव्हा देशात मोबाईल नव्हते, ट्रोलिंगचा प्रकार नव्हता त्यावेळेसपासून माझ्यावर टीका सुरु आहे. मी अग्रलेखात सर्रास काँग्रेसचं समर्थन केलं आहे. ते मान्यही करतो. पण त्याचबरोबर मी मी ज्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं तिथे माझ्यावर टीका करणारे लेखही छापले. यालाच निपक्षपातीपणा म्हणतात. माझी भूमिका स्पष्टपणे मांडत असलो तरी, व्यक्तीश: माझ्यावर टीका करणारे लेख अग्रलेखाच्या पानावर छापले आहेत. बहुदा माझ्या स्पष्ट भूमिकेबाबतच वृत्तपत्रांच्या मॅनेजमेंटचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळे मला कायम वेगवेगळ्या ऑफर मिळाल्या.’ असं केतकर यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments