Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रआज मध्यरात्रीपासून बेस्टचा बेमुदत संप

आज मध्यरात्रीपासून बेस्टचा बेमुदत संप

मुंबई : बेस्ट समितीच्या सभेत ४५० बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले असून, हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

दुसरीकडे, बेस्ट उपक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेण्यास असमर्थ ठरलेल्या सत्ताधारी शिवसेनेने ४५० बसगाड्या भाड्याने घेण्याच्या प्रस्तावास मान तुकवली. यामुळे बेस्ट कामगार कृती समितीने पुकारलेल्या संपात सामील होण्यास बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी नकार दिला आहे. परिणामी, कृती समितीमध्ये फूट पडली आहे. १२ फेब्रुवारी २०१८ च्या बेस्ट समितीच्या सभेत ४५० बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले आहे. हे टेंडर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हितांच्या विरोधात आहे. आता अस्तित्वाचा लढा सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून बेस्ट बंद पुकारण्याची वेळ आली आहे. कामगारांनी स्वतःहून  बंद पाळावा.” असं आवाहन बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या शशांक राव यांनी केले आहे.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कामगारांचे पगार देणेही अवघड झाले आहे. त्यात महापालिकेने अर्थसंकल्पात बेस्टच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे सन २०१८-१९चा अर्थसंकल्पही रखडला आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. अखेर ४५० बसगाड्या भाड्याने घेऊन पगाराचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. खासगीकरणाच्या या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये नुकतीच मंजुरी मिळाली. सर्वपक्षीय सदस्यांनीही यास हिरवा कंदील दाखविला. मात्र या खासगीकरणाला विरोध दर्शवित बेस्ट कामगार कृती समितीने १५ फेब्रुवारीपासून संपाची हाक दिली आहे. सत्ताधारी शिवसेनेला आपले अपयश झाकण्यासाठी या प्रस्तावास मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या कामगार सेनेने संभाव्य संपातून माघार घेतली आहे. बेस्टच्या बंदच्या हाकेमुळे प्रवाशांचे हाल होणार हे नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments