Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभ मातंग समाजासाठी 1 लाख घरे -...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभ मातंग समाजासाठी 1 लाख घरे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* अण्णा भाऊ साठे यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन *अण्णा भाऊ साठे चित्रपटाची निर्मिती करणार *स्मारकाचे काम लवकर पूर्ण करणार *पुण्यात लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी जमीन आरक्षित

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन रंगशारदा सभागृह, बांद्रा येथे केले होते. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी 49 वर्षाच्या खडतर आयुष्यात वंचित शोषितांच्या व्यथांना आपल्या साहित्यातून आवाज दिला. अण्णा भाऊंची साहित्य निर्मिती जगासाठी आकर्षण बिंदू होती. त्यांचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत होण्याचा विक्रम आहे. यातच त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य दिसून येते. अण्णा भाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचार, साहित्य शेवटच्या घटकांपर्यत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी शासन पूर्ण ताकदीनिशी योगदान देईल. मातंग समाजाला एक लाख घरे देण्यात येतील. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल. यासाठीही आवश्यक तो निधी देण्यात येईल. क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने मातंगांच्या विकासासाठी केलेल्या शिफारशीचीही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी सदैव प्रयत्न केले. शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जन्मशताब्दी वर्षात प्रयत्न करु.

वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, अण्‍णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. वंचितांसाठी लढणाऱ्या अण्णांचे टपाल तिकीट केंद्र सरकारने केवळ आठच दिवसात मंजूर केले. वंचितांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर महामंडळामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते टपाल तिकीटाचे अनावरण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम, जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन तसेच जळगाव तरुण भारतच्या जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आमदार दिलीप कांबळे, सुधाकर भालेराव, भाई गिरकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, पोस्ट मास्तर जनरल मुंबई क्षेत्राच्या श्रीमती स्वाती पांडे व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments