Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआमदाराची तुरुंगातून फ्लॅटवारी करणा-या पोलीस निरीक्षकासह चार कर्मचारी बडतर्फ

आमदाराची तुरुंगातून फ्लॅटवारी करणा-या पोलीस निरीक्षकासह चार कर्मचारी बडतर्फ

Ramesh kadam ncp thene
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ठाणे कारागृहात असलेले आमदार रमेश कदम यांना नियमबाह्य मदत केल्याने, पोलीस अधिका-यासह चार कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तांनी केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार रमेश कदम तुरुंगातूनच विधानसभेची अपक्ष निवडणूक लढत आहेत. आमदार रमेश कदम यांना तुरुंगातूनच वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, जेजे रुग्णालयात तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी घेऊन गेले. ही माहिती मिळताच निवडणूक आयोग विभाग आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट एक यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आमदार कदम हे बेकायदेशीररित्या कारागृहाबाहेर असल्याचे पुढे आले. ज्या पुष्पांजली सोसायटीत आमदार रमेश कदम हे पोलिसांना आढळून आले. त्यावेळी कदम यांच्यासोबत तब्बल 53 लाख रुपयांची रक्कमही सापडली. ही माहिती पोलीस चौकशीतून समोर आली.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार, पोलीस कॉन्स्टेबल डी चव्हाण, डी खेताडे, यू. कांबळे, व्ही. गायकवाड यांना बडतर्फ करण्यात आले. अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ठाणे कारागृहात असलेले आमदार रमेश कदम यांना नियमबाह्य मदत केल्याने या पाचही जणांवर ठाणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली.

रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यांच्याकडे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद होते. दरम्यान, या महामंडळात घोटाळा केल्याच्या आरोपाखाली रमेश कदम यांची चौकशी सुरु आहे. सध्या त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, तुरुंगातूनच ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments