Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईयोगेश सोमण यांच्यावरील कारवाई शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणाकरता; सचिन सावंतांचे प्रतिउत्तर

योगेश सोमण यांच्यावरील कारवाई शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणाकरता; सचिन सावंतांचे प्रतिउत्तर

Sachin Sawant - Yogesh Somanमुंबई : भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरण्यात आले होते. अननुभवी, अकार्यक्षम, आणि अपात्र लोकांची केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवरती नेमणूक करुन शिक्षण व्यवस्थेचे संघीकरण करण्याचा भाजपा सरकारचा डाव असतो. योगेश सोमण य़ांच्यावर झालेली कारवाई ही असहिष्णुता नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण आहे असे खणखणीत उत्तर भाजपाच्या टीकेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन यांनी दिले आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, योगेश सोमण ही व्यक्ती, त्यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. यांना शिकवण्याचा कोणताही अनुभव नाही, नाट्यशास्त्र विभागाची कोणतीही पदवी यांनी घेतलेली नाही. ते राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी होते, असे असतानाही काही योग्य आणि पात्र व्यक्तींना डावलून सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर बसून ते भाजपाचा व संघाचा प्रचारच करत होते आणि शिक्षणव्यवस्थेचे संघीकरण करण्याच्या मोठ्या कारस्थानाचा एक भाग होते. इतर अनेक महत्त्वाच्या पदावर नियुक्त केलेल्या संघाच्या लोकांप्रमाणेच सोमण यांचा राजकीय उपयोग भाजप करुन घेत होता आणि त्यांची राजकीय विधाने ही याच कार्यपद्धतीचा भाग होती. सरकारी पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने राजकीय मते मांडू नये किंवा राजकीय पक्षांशी जवळीक असू नये असे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांवलीनुसार उल्लेखीत आहे. असे असतानाही बेफामपणे सोमण हे अशापद्धतीची विधाने करु शकले याचे कारण भाजप सरकारचे त्यांना संरक्षण होते. याचकारणाने आशिष शेलारांसारखे भाजप नेते योगेश सोमण यांच्यावर झालेल्या कारवाईला असहिष्णुता म्हणून उर बडवत आहेत. खऱ्या अर्थाने एनएसयुआयने केलेले आंदोलन हे लोकशाही आणि शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी होते आणि सोमण यांच्यावर केलेली कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी होती असे सावंत म्हणाले.

संघ विचारधारेच्या लोकांना महत्वाच्या पदावर बसवले….

गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये संघ विचारधारेच्या अपात्र, अननुभवी, अयोग्य व्यक्तींच्या केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवर झालेल्या नियुक्त्या या रद्द करुन योग्य आणि पात्र व्यक्तींना त्या पदांवर नेमणे हे शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाची दुरवस्था अशाच लोकांमुळे झालेली आहे, असेही सावंत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments