Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र...

तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल — राज्यपाल

Mumbai University Kalina, Bal Apte,Kalina,Mumbai Universityमुंबई: विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले स्वतःचे समर्पित अभ्यास केंद्र असणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरूणांसाठी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.

राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचवेळी या इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते झाले.

राज्यपाल यावेळी म्हणाले, आधुनिक चळवळींमध्ये जागतिक स्तरावर लोकांना एकत्रित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर होतो. संप्रेषण काळ म्हणजेच कम्युनिकेशन ट्रेंडशी जुळवून घेणे हा यशस्वी चळवळीचा पाया आहे. जगभरातील सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे मोठे योगदान लाभले आहे. शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर सुरु करण्यात येत असल्याचा आनंद आहे.

भारतातच नव्हे तर जगातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वा आर्थिक परिवर्तनामध्ये युवावर्गाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थी व युवा चळवळींचा आंतरविद्याशाखीय तसेच तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील तसेच समकालीन विद्यार्थी युवाचळवळींची विचारप्रणाली, कार्यपद्धती, सामाजिक-राजकीय भूमिका व योगदान यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हे या केंद्राचे वैशिष्ट्य असेल असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला.

आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे या मांडणीवर दृढ विश्वास ठेऊन त्यांच्याशी निगडीत विषयांची तर्कशुद्ध मांडणी करणे, या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील.

इतिहास आपल्याला दाखवतो की, प्रत्येक पिढी एका यशस्वी चळवळीने प्रभावित झाली आहे. आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत आहोत. आपल्या जीवनात महात्मा गांधींनी समाजातील प्रचलित परिस्थिती बदलण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांचे सबलीकरण होऊन समाजाची मानसिकता बदलण्यासाठी विविध चळवळी घडवून आणल्या. इतिहासातील सर्व चळवळींचे नेतृत्व नेहमीच तरुणांनी केले आहे. मानवी इतिहासाचा मार्ग बदलणाऱ्या शक्तिशाली सामाजिक चळवळींसाठी बाळ आपटे सेंटर ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखले जाईल असेही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, प्रा. बाळ आपटे यांना अगदी जवळून जाणून घेण्याचा बहुमान मला लाभला. यामुळे मला असे वाटते की, त्यांची स्मृती कायम जपण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी युवा चळवळींमध्ये अभ्यासाचे एक केंद्र तयार करणे यापेक्षा दुसरे काही असू शकत नाही. प्रा. आपटे एक उत्तम व्यक्ती, उत्तम विचारवंत होते. तरुण विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी तसेच,या विद्यार्थ्यांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राची स्थापना केली गेली आहे.

या केंद्रामध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी विद्यार्थी व युवक चळवळीसंबंधी ज्ञानाचा खजिना उपलब्ध होणार आहे. यासाठी आर्ट गॅलरी, अद्ययावत ग्रंथालय तसेच दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभावी उपयोग करुन बनविलेले संशोधन साहित्य यांचा समावेश असणार आहे.

या केंद्रातील शैक्षणिक उपक्रमांमधून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देतील असे सशक्त युवा पदवीधर, संशोधक आणि नेतृत्व तयार होईल, असा विश्वास वाटत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यावेळी म्हणाले, बाळ आपटे आणि माझी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासूनची मैत्री होती. एक चांगला मित्र कसा असावा हे मी बाळ आपटे यांच्याकडूनच शिकलो. विदयार्थी आणि युवकांना दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यकाळात केला आणि हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह कार्यवाह दत्तात्रय होसबाळे म्हणाले, मुंबईत प्रा. बाळ आपटे यांच्या कार्यांचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे यापेक्षा दुसरा आनंद नाही. आजच्या तरुण वर्गामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. व्यापक दृष्टिकोन ठेऊन निर्माण करण्यात येणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व युवावर्गाला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, राष्ट्रीय संघटना मंत्री सुनील अंबेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय प्रा. बाळ आपटे यांच्या पत्नी निर्मला बाळ आपटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments