Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना, काँग्रेस आमदाराला भाजपकडून ५० कोटींची ऑफर : काँग्रेस

शिवसेना, काँग्रेस आमदाराला भाजपकडून ५० कोटींची ऑफर : काँग्रेस

मुंबई: शिवसेना, काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलीक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप कर्नाटक, गोवा प्रमाणे आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, विरोधी पक्ष अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांनाही भाजपकडून फोन आले असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आपल्याला फोन आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली आहे. आपल्याला काही कार्यकर्त्यांचे फोन आले, काही कार्यकर्ते आपल्या घरीही आले, मात्र मी घरी न थांबता बाहेर निघून गेलो. हे कोण कार्यकर्ते होते आणि ते कशासाठी आले होते, याचा अंदाज सर्वांनाच आहे, असे सांगत भाजपने आपल्याला वळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे खोसकर यांनी सांगितले.

आमदारांनो ‘फोन टॅप करा, पुरावे गोळा करा’…

भारतीय जनता पक्षाकडून जर कोणत्याही आमदाराला फोडण्यासाठी फोन आले, तर ते सर्व फोन टॅप करावेत, त्याच्याविरोधात पुरावे गोळा करावेत आणि त्यांना उघडे पाडावे, अशा सूचना आम्ही सर्व आमदारांना दिल्या असल्याचे वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, आमचा कोणताही आमदार फुटणार नाही असे सांगताना, जर कुणी फुटलेच, तर त्याच्यापुढे आम्ही सर्वांच्यावतीने कॉमन उमेदवार उभा करून फुटलेल्या आमदाराला पाडू आणि त्याला राजकारणातूनच हद्दपार करू,असे आम्ही विरोधी पक्षांनी ठरवले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा दिल्या असल्याचे सांगत भाजप सत्ता का स्थापन करत नाही, असा सवाल वडेट्टीवारांनी केला. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागली, तर या स्थितीला भाजपच जबाबदार असेल असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments