Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभिडे प्रकरण: सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है!

भिडे प्रकरण: सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है!

Elgar Rally Mumbai

मुंबई: मंत्रालयातील उंदरांना पकडण्याऐवजी सरकारने आधी संभाजी भिडेंना अटक करावी, अशी मागणी एल्गार मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारवरील रागही व्यक्त केला.

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींना अटक करा, या मागणीसाठी मुंबईत सोमवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोर्चासाठी बारामतीतून आलेला तरुण म्हणाला, ‘संभाजी भिडे प्रसारमाध्यमांसमोर येतो, पण पोलिसांना सापडत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. पण त्याच संविधानाचा गैरवापर करुन भिडेला संरक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार भिडेला संरक्षण देत आहे’, अशी टीका बारामतीवरुन आलेल्या तरुण कार्यकर्त्याने दिले. तर सरकारने मंत्रालयात उंदीर शोधण्याऐवजी आधी संभाजी भिडेंना शोधून अटक करावी, अशी मागणी एका आंदोलकाने केली.

मोर्चासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चासाठी महिनाभरापूर्वी पत्र दिले. पण हे मनुवादी सरकार असून भिडे गुरुजींना संरक्षण दिले जात आहे. एल्गार मोर्चा हाणून पाडण्याचा डाव भाजपाने आखला, असा आरोप त्याने केला. प्रकाश आंबेडकर यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्यातील सरकार गद्दार आहे. संभाजी भिडेला अटक झाली पाहिजे. सरकार हुकूमशाही करत आहे. संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे. त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. चहा विकणारा व्यक्ती आज देशाचा पंतप्रधान झाला. हे सगळे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच त्या गादीवर बसू शकला. पण दुर्दैवाने तीच व्यक्ती आज गद्दार झाली, अशी टीका या महिलांनी केली.

राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो तरुण मुंबईत आले आहेत. सरकारने त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. भिडे गुरुजीला अटक झालीच पाहिजे, अशी मागणी एका तरुणीने केली. सरकारने अॅट्रोसिटीसंदर्भातील नाटकं बंद करावीत, असेही तिने माध्यमांना सांगितले. रणरणत्या उन्हातही कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात गर्दी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments