Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमाजी महापौरांचा स्वाईनफ्लू ने मृत्यू

माजी महापौरांचा स्वाईनफ्लू ने मृत्यू

कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं आज ठाण्यात खासगी रुग्णालयात निधन झालं. गेले 15 दिवस त्या न्यूमोनिया आणि फुफ्फुसांचा संसर्ग झाल्यामुळे ठाण्यात हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांना स्वाईन फ्लू झाला होता, असं समजतं. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याणी पाटील या कल्याण पूर्वेतून 2005 आणि 2010 अशा दोन वेळा शिवसेनेकडून महापालिकेत निवडून गेल्या होत्या. 2013 ते 2015 अशी दोन वर्ष त्यांना महापौरपद ही देण्यात आलं होतं. मात्र 2015 च्या निवडणुकीत त्यांचा फक्त 50 मतांनी पराभव झाला. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचं मोठं संघटनात्मक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली आहे.

माजी महापौर कल्याणी पाटील यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची भीती पसरली आहे. नेहमीच्या तापासारखा वाटणारा हा आजार कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना H1N1 ची लागण लवकर होते. मधुमेह असेल तर या विषाणूची लागण व्हायची शक्यता जास्त असते. जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर उजाडला तरी  जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. त्यामुळे  स्वाईन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

राज्यभरात या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फ्लूबरोबरच स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण वाढल्यामुळे काळजी वाढली आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरसमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून H1V1 या व्हायरसमुळे होतो, हे आता चांगलंच माहिती आहे. पण या आजाराचं लवकर निदान होत नाही आणि धोका वाढतो.

औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळून येत असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढल्याने गांभीर्य वाढलं.

ही आहेत लक्षणं

सर्दी, खोकला – कफाचं प्रमाण वाढत जातं. न्यूमोनिया आणि फुफ्फुसात संसर्ग होतो.

ताप – ताप औषध घेऊन उतरतो पण पुन्हा चढतो. अशक्तपणा वाढत जातो.

अंगदुखी – सततची अंगदुखी. सांधे जास्त दुखतात.

जुलाब – अन्नावरची वासना उडते, जुलाब आणि उलट्याही होतात.

अशक्तपणा – डोळे लाल होतात आणि कमालीचा अशक्तपणा येतो.

हे लक्षात ठेवा

स्वाईन फ्लूचा आजारा हवेतून पसरतो. H1N1 ची लागण झालेल्या रुग्णाला वेगळ्या खोलीत झोपवावे, त्याच्या जवळ जाताना मास्क लावून जावे. रुग्णाचे कपडे, रुमाल वेगळे धुवावेत. वेळेवर खाणं, भरपूर पाणी पिणं आणि औषध घेणं ही रुग्णाची काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments