होम महाराष्ट्र मुंबई सीएसएमटी स्थानकावर तरुणीची छेड काढणारा मवाली जेरबंद

सीएसएमटी स्थानकावर तरुणीची छेड काढणारा मवाली जेरबंद

27
0

CSMT railway station, accused arrestedमुंबई : सोमवारी रात्री साडे दहा वाजता सीएसएमटी स्थानकावर लोकलमध्ये चढणाऱ्या दोन तरुणींची छेड काढणाऱ्या मवालीला सीएसएमटी-जीआरपी पोलिसांनी जेरबंद केले. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक दोनवर पनवेल लोकलमध्ये चढताना दोन तरुणींची छेड काढण्यात आली. गर्दीचा फायदा घेत त्याचे इतर तीन साथीदार फरार झाले.

धर्मेश हरके परिहार (वय १९) असं आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही आपल्या मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी पनवेल लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना मागून आलेल्या टोळक्यातील एकाने या पीडितेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणीने स्वतः साहस दाखवत छेड काढणारा मवाली धर्मेश हरके परिहार याला पकडले आणि आरडाओरडा केला. मात्र गर्दीचा फायदा घेत या आरोपीचे इतर ३ साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
पीडित तरुणीने आरडाओरड केल्याने सीएसएमटी स्थानकावर हजर असलेल्या जीआरपी पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. या संदर्भात पोलीस चौकशीत आरोपी धर्मेश हा बोरिवली येथील एमएचबी कॉलनीत राहणारा असून तो वॉचमन म्हणून एका ठिकाणी कामाला असल्याची माहिती समोर आली. जीआरपी पोलिसांनी या संदर्भात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.