
मुंबई: सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर आज बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान, हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारातच पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली, तसेच, “सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे,” असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.
यावेळी हेमंत नगराळे म्हणाले, “मी नुकताच मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकरला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे आणि ही समस्या आपण सर्वांच्या मदतीने व माझ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासानाने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नेमणुकीच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलेला आहे.”
सर्वांच्या सहकार्याने नागरिकांच्या सहकार्याने आम्ही एक सक्षम पोलीस दल म्हणून कार्य करू
तसेच, “मुंबई पोलिसांची प्रतिमा जी मलिन झालेली आहे. त्याला चांगली करण्याचा व आपल्या मुंबई शहरातील अधिकारी, कर्मचारी सर्वांचं सहकार्य सहभाग या कार्यात लाभणार आहे आणि तो निश्चिपणे मला मिळेल, याची मला शाश्वती आहे. आपण सगळ्यांनी देखील या कार्यात सहकार्य करावं. जेणेकरून महाराष्ट्र पोलिसांचं, मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल आणि कोणत्याही प्रकारची टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने नागरिकांच्या सहकार्याने आम्ही एक सक्षम पोलीस दल म्हणून कार्य करू शकू, अशी मी आपणास ग्वाही देतो.” असंही नगराळे यांनी यावेळी बोलून दाखवलं.
जे काही आपण बघत आहात, ज्या प्रकारचं अधिकाऱ्यांचा समावेश आहे ते योग्य नव्हे. या गुन्ह्याबाबतचा तपास हा एनआयए किंवा एटीएसकडून करण्यात येत आहे आणि तो योग्यरितीने तपास होईल, याची मला संपूर्ण खात्री आहे. जे कुणी दोषी असतील, जे कुणी यामध्ये सहभागी असतील, त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.