मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात तब्बल 5 पटींनी वाढ

15 जून 2021 पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील

- Advertisement -
indian-railways-raised-platform-ticket-price-to-rs-50-at-key-stations-in-mumbai
indian-railways-raised-platform-ticket-price-to-rs-50-at-key-stations-in-mumbai

मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवली आहे. मध्य रेल्वे (सीआर) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार य़ांनी सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि उन्हाळा या दोन्ही बाबी पाहता गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.

1 मार्चपासून ही दरवाढ लागू झाली असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुट्टीच्या हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 15 जून 2021 पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

काही निवडक स्टेशनवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटलं आहे. विशेषतः ज्या स्टेशनवर बाहेरगावी जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसना थांबा आहे, अशा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर 50 रुपये करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे.  मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. तर मुंबई महापालिकेने करोना नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत. मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून मुंबईत कोरानाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत 3.25 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे , तर कोरोनामुळे 11 हजार 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -