आता लोकल ट्रेनमध्ये मास्क न वापरणा-यांवर मार्शलची नजर

- Advertisement -
mask-mandatory-while-travellin-in-mumbai-local-trains-

mask-mandatory-while-travellin-in-mumbai-local-trains-

मुंबई: मुंबईत कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर असताना त्यास रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यात, लोकल प्रवासात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या चुकार प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील लॉकडाउन निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात करोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यास वेळीच आवर घालण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने नव्याने आढावा सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी लोकल प्रवासात मार्शल नियुक्त करून कारवाई केली जाणार आहे. याबाबत, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दुजोरा दिला आहे.

रेल्वे यंत्रणेचीही मदत

सध्या लोकल स्थानकांवरदेखील मास्क न वापरणाऱ्याविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र, लोकलमध्ये प्रवासी मास्क वापरत नसल्यास ते कळणे अवघड होते. त्यात गर्दी असल्यास मास्क न वापरला नसल्यास करोना संसर्गाची भीती आणखीन वाढते. त्यामुळे पालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम, मध्य, हार्बर अशा सर्वच मार्गांवरील लोकलमध्ये ही कारवाई केली जाईल. या कारवाईसाठी किती मार्शल नेमले जातील, रेल्वे यंत्रणेचीही मदत घेतली जाणार हे लवकरच स्पष्ट केले जाईल.

- Advertisement -