Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर? मोदींच्या कौतुकामुळे चर्चेला उधाण

मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर? मोदींच्या कौतुकामुळे चर्चेला उधाण

Milind Deora, BJP, Congress, Howdy Modiमुंबई : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी भारताची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवून दिल्याबद्दल देवरांनी मोदींची प्रशंसा केली आहे. देवरांच्या ट्वीटची दखल घेत नरेंद्र मोदींनीही त्यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, देवरा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

‘ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्त्वपूर्ण होता. माझे वडील मुरली देवरा हे भारत आणि अमेरिका यांच्या दृढ संबंधांची अग्रणी होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आदरातिथ्य आणि त्यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांच्या योगदानाची ठेवलेली जाण, याचा आम्हाला अभिमान वाटतो’ असं देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘तुम्ही अगदी बरोबर आहात, माझे मित्र दिवंगत मुरली देवरा यांची अमेरिकेसोबतच्या दृढ संबंधांची वचनबद्धता तुम्ही योग्य पद्धतीने अधोरेखित केलीत. दोन राष्ट्रांमधील संबंध गहिरे होत असल्याचं पाहून त्यांना खरोखर आनंद झाला असता. अमेरिकन अध्यक्षांची कळकळ आणि आदरातिथ्य अप्रतिम होती.’ असं उत्तर मिलिंद देवरांच्या ट्वीटला मोदींनी दिलं. त्यावरही देवरांनी मोदींचे आभार मानले.

विशेष म्हणजे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रीजिजू यांनीही देवरांचं कौतुक केलं. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन पंतप्रधानांचं कौतुक केल्याबद्दल रीजिजू यांनी देवरांविषयी कौतुकोद्गार काढले.

सुरुवातीपासून काँग्रेसची धुरा वाहणाऱ्या देवरा कुटुंबाचे शिलेदार मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर आहेत का, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद सर्वांना परिचित असल्यामुळे या अफवांना खतपाणी मिळालं.

काही महिन्यांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता देवरा भाजपवासी होता की काय अशी चर्चा रंगली आहे. मात्र देवरा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments