Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

when-fadnavis-was-the-chief-minister-anvay-naik-case-was-suppressed-minister-anil-deshmukh-
when-fadnavis-was-the-chief-minister-anvay-naik-case-was-suppressed-minister-anil-deshmukh-

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आज (मंगळवार)विधानसभेत केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर देत, माझी खुशाल चौकशी करा, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हटलं. यामुळे विधासभेत बराचकाळ गोंधळ निर्माण झाला होता.

शिवसेनेचा आमदार भास्कर जाधव यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की, “२०१८ मध्ये अन्वय नाईक व त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकलं. त्यानंतर हे प्रकरण या सरकारकडे आलं, अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं की, माझ्या नवऱ्याने व सासुने आत्महत्या केलेली आहे.

पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं आणि त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरू केली. ती चौकशी सचिन वाझे करत होते. सचिन वाझेंकडे ही चौकशी राहू नये, ही जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील. म्हणून सचिन वाझेला टार्गेट केलं जातंय. त्यामुळे सचिन वाझेंना अजिबात काढायचं नाही, यांचीच चौकशी होईल म्हणून हे असं करत आहेत.”

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. पण सचिन वाझेवर कारवाई का नाही?”

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तक्रार त्यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना दाबलं.” असं बोलून भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपास दुजोरा दिला.

म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले आहेत – भास्कर जाधव

तर, “अर्णब गोस्वामीला सचिन वाझेनं घरातून उचलून आणलं आणि म्हणून यांना दुःख होतंय. त्याचबरोबर न्यायाधीश लोढा यांची नागपुरात हत्या झाली, ही हत्या का झाली? हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. सचिन वाझे हा जर तपास अधिकारी राहिला तर यांचे बिंगं फुटेल. यांना बेड्या पडतील, म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले आहेत. माझी सरकारला विनंती आहे की, सचिन वाझेला हटवू नका, यांची चौकशी करा.” असं देखील भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.

यावर “देवंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक आत्महत्येचे प्रकरण दाबलं. त्याची आम्हाला चौकशी करायची आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही – फडणवीस 

सर्वात शेवटी “माझं खुलं आव्हान आहे की माझी चौकशी करा. कर नाही त्याल डर कशाची. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ आलेला आहे.” असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं. यानंतर सभागृहातील प्रचंड गोंधळामुळे कामकाज काही वेळासाठी अध्यक्षांकडून तहकूब करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments