Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणआजपासून मुंब्रा बायपास २ महिने बंद

आजपासून मुंब्रा बायपास २ महिने बंद

मुंब्रा: मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त सापडला असून सोमवार मध्यरात्रीपासून हा मार्ग वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र या पर्यायी मार्गावरही पहाटेपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे.

आनंदनगर जकातनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून ,कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे कोंडीमुळे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. पुढील दोन महिने या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात येणार असून त्यामुळे ठाणे तसेच नवी मुंबईदरम्यानच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

मात्र, या बदलांनंतरही ठरावीक ठिकाणी वाहनांचा लोंढा वाढणार असून तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ऐरोली, आनंदनगर पथकर नाके तसेच नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी आणि ठाणे-बेलापूर मार्गाचा काही भाग हे वाहतूक कोंडीचे जंक्शन ठरणार आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तयारी केली असली तरी, सर्वसामान्य तसेच वाहनचालकांनाही या कोंडीसाठी सज्ज राहावे लागणार आहे. या कामामुळे अवजड वाहतूकीचा भार शहरातील अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी तीन विभागांमध्ये वाहतुकीचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार गुजरात, भिवंडी आणि नाशिक या भागात जाणारी आणि या भागांमधून जेएनपीटीच्या दिशेने येणारी वाहने वेगवेगळ्या मार्गावरून सोडण्यात आली आहेत. जेएनपीटी येथून गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक महापे सर्कल, रबाळे नाका, ऐरोली, पटणी सर्कल, ऐरोली सर्कल, मुलुंड, आनंदनगर चेक नाक्यावरून घोडबंदरच्या दिशेने वळविण्यात आली आहे. या मार्गावर दुपार आणि रात्रीच्या वेळेत ही वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांचा भार वाढून त्या ठिकाणी कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐरोली, आनंदनगर चेक नाका आणि अरुंद कोपरी पुलावर नेहमीच वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. त्यात आता अवजड वाहनांमुळे आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापे सर्कल येथून रबाळे एमआयडीसी मार्गे अवजड वळविण्यात आली आहे. मात्र, ही वाहने रबाळे नाका येथून ठाणे-बेलापूर मार्गावर येऊन ऐरोली पटणी सर्कल येथून आनंदनगरच्या दिशेने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी ही वाहने रबाळे नाक्यावर येणार असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार आहे. ऐरोली उड्डाण पुलाजवळील अरुंद मार्ग असल्यामुळे कोंडीत भर पडणार आहे. या कोंडीचा फटका ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली, रबाळे नाका आणि घणसोली भागाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाहनचालक गोंधळले….
जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने निघालेली अवजड वाहने महापे सर्कल येथून नवी मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. मात्र, या मार्गाच्या तोंडावरच सिंमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी अरुंद मार्ग आहे. शिळफाटा, महापे सर्कल आणि अन्य ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, रबाळेपासून पुढे पुरेसे सूचना फलक दिसून येत नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

फलकांवर अधिसूचना-
मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्ती कामासाठी वाहतूक बदलांच्या मार्गावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अधिसूचनांचे मोठे फलक लावण्यात आल्याचे दिसून येते. या फलकावरील मजकूर वाचण्याइतका चालकांकडे वेळ असतो का आणि प्रत्यक्षात त्यांना हे वाचणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच वाहन चालकांनी नेमके कोणत्या दिशेने जायचे याविषयी दिशा दाखविणाऱ्या फलकांचा अजूनही वाहतूक बदलांच्या मार्गावर अभाव दिसून येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments