Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भनागपूरमोठ्या बहिणीच्या विरहातून छोट्या बहिणीने केली आत्महत्या!

मोठ्या बहिणीच्या विरहातून छोट्या बहिणीने केली आत्महत्या!

girl suicide

नागपूर : नागपूरमध्ये १६ वर्षीय तरुणीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली समोर आली आहे. वर्षभरापूर्वी मोठ्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून आकांक्षा गुप्ताने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. वर्षभरापूर्वी मृत्युमुखी पडलेली मोठी बहीण नेहमीच माझ्या स्वप्नात येते आणि स्वतःकडे बोलावते, असं आकांक्षा सांगायची.

थोरल्या बहिणीच्या अकाली मृत्यूनंतर आकांक्षा नैराश्यात गेली होती. यातूनच आकांक्षाने टोकाचं पाऊल उचलल्याचं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. नागपूरच्या भिवसेनखोरी परिसरात राहणाऱ्या आकांक्षाने २७ मार्चला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना स्वतःवर रॉकेल टाकून पेटवलं. ८० टक्के भाजलेल्या आकांक्षाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी तिचा मृत्यू झाला. कोवळ्या वयाची आकांक्षा गेल्या एका वर्षापासून कमालीच्या नैराश्यात होती. लहानपणापासून ज्या बहिणीवर जीवापाड प्रेम होतं, तिच्याविना आकांक्षाला एक घासही जात नव्हता. ज्योती गुप्ताचा आजारपणामुळे दिल्लीत मृत्यू झाला होता. तेव्हापासून नागपुरात असलेल्या आकांक्षाने मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये मिसळणं बंद केलं. तिचा स्वभाव बदलला होता. मला ज्योतीजवळ जायचं आहे, असं सांगून ती वारंवार रडायची. याच नैराश्यात तिने स्वतःला पेटवून घेतलं.

पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. हा अंधश्रद्धेचे प्रकार तर नाही ना, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते ज्या थोरल्या बहिणीवर आकांक्षा जीवापाड प्रेम करायची. जिच्यासोबत तिचे लहानपणापासून भावनात्मक बंध होते, जिने तिला आईच्या रुपात सांभाळलं होतं. तिच्या अकाली मृत्यूचे दुःख आकांक्षा पचवू शकली नाही. त्याच नैराश्याच्या भावनेतून तिने हे कृत्य केलं. ही भूतबाधा किंवा इतर अंधश्रद्धेचा प्रकार नसून डिप्रेशनमुळे आकांक्षाने जीव दिल्याचं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं. एका वर्षाच्या आत दोन बहिणींचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यामुळे गुप्ता कुटुंबियांवर आणि भिवसनखोरी परिसरावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments