आमच्या लोकांना अजूनही सत्ता बोचते – नितीन गडकरी

- Advertisement -

मुंबई: जे लोक अनेक वर्षे विरोधी पक्षात काम करतात ते सत्तेत गेल्यानंतरही विरोधकांप्रमाणेच वागतात. आमच्यातल्या काही लोकांची अवस्था अजूनही अशीच आहे. त्यांना सत्ता बोचते. सत्तेपेक्षा आंदोलनाचे आणि तुरूंगातले दिवस त्यांना अधिक प्रिय वाटतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलत होते.

यावेळी गडकरींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिलेले लोक सत्तेत गेल्यानंतर विरोधकांप्रमाणेच वागतात. यावेळी गडकरींनी व्यासपीठावर बसलेल्या दिवाकर रावते यांना उद्देशून, ‘मी हे तुम्हाला बोललो नाही’, असा खुलासा करून शिवसेनेला परस्पर टोला लगावला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही भूमिकांमधील समतोल कायम राखला. त्यांनी विरोधी पक्षात असताना कधीही संयम सोडला नाही आणि सत्तेत असताना उन्माद दाखवला नाही.

हल्लीच्या काळात विचारांशी कटिबद्धता नसलेले अनेकजण दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विचारांशी प्रामाणिक न राहता सत्ता असलेल्या पक्षामध्ये जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी आयुष्यभर आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. नदीच्या प्रवाहाबरोबर काडीकचरा आणि मेलेले मासे वाहत जातात. मात्र, जिवंत मासे सतत प्रवाहाविरुद्ध पोहत राहतात. तुम्ही आयुष्यभर एकाच प्रवाहाबरोबर राहतात, यासाठी तुमचे अभिनंदन, असे म्हणत गडकरी यांनी दिलीप वळसे पाटील यांचे कौतुक केले.

- Advertisement -
- Advertisement -