Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रसाई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं!

साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं!

शिर्डी/पंढरपूर : सलगच्या सुट्टया आणि नव्या वर्षानिमित्त असंख्य साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. याशिवाय भक्तांना थांबण्यासाठी तात्पुरत्या मंडपांचीही सोय करण्यात आली.

भक्तांच्या गर्दीमुळे दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळत आहे. शिवाय दर्शना अगोदर टाईम दर्शनाचा पास काढताना भाविकांची मोठी दमछाक होत आहे. तर गर्दी वाढल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
नाताळच्या सुट्टयांमध्ये नेहमीच गर्दीचा उच्चांक होत असतो. यंदा शनिवार , रविवार त्यासोबत सोमवार नाताळ अशी सलग सुट्टी आल्याने शिर्डीत भक्तीचा मळा फुलला आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज रात्री आणि ३१ डिसेंबरला या दोन दिवशी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठीही शिर्डी वाहतूक शाखेने महत्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक शिर्डीत येत असल्याने संस्थानने अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ठिकठिकाणी अतिरिक्त निवास व्यवस्था, मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

पंढरपुरातही भक्तांची गर्दी, हॉटेल चालकांकडून लूट
सलग सुट्ट्यांमुळे आज दुसऱ्या दिवशी पंढरपुरात भक्तांनी मोठी गर्दी केली. यामुळे शहरातील हॉटेल, लॉजेस आणि धर्मशाळा हाऊसफुल झाल्या आहेत. काल रात्रीपासून जवळपास १५ ते २० हजार खाजगी वाहनं शहरात दाखल झाली आहेत. त्यामुळे दर्शन रांग थेट तीरापर्यंत गेली आहे. वाढलेल्या गर्दीचा फायदा शहरातील हॉटेल चालकांनी घेण्यास सुरुवात केली असून अचानक दारात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी भाविकांकडून करण्यात येत आहेत. तरीही जागा मिळणं अशक्य होऊ लागल्याने अनेक पर्यटकांनी अशा कडाक्याच्या थंडीतही आपापल्या गाडीतच झोपून रात्र काढली. सोमवारीही सुट्टी असल्याने या गर्दीत अजूनही मोठी वाढ होणार आहे. प्रशासन देखील आता खडबडून जागं झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments