पद्मावती’ पुन्हा अडचणीत; मुख्यमंत्र्यांच्या निवासावर काढणार मोर्चा

- Advertisement -

 मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या वादग्रस्त पद्मावती सिनेमाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता राजपूत समाजाने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला आहे. राजपूत समाजाच्या सदस्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांची मंत्रालयात भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक संजय लिला बन्साली यांनी पद्मावती सिनेमा तयार करताना इतिहासाशी छेडछाड करून राजपूतांचा अपमान केला असल्याचा आरोप राजपूत महामोर्चाकडून करण्यात आला आहे. पद्मावती सिनेमाच्या कथानकामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावणार आहेत. त्यामुळे हा सिनेमाच प्रदर्शित करू नका, अशी भूमिका राजपूत समाजाने घेतली आहे. या सिनेमाच्या विरोधात १७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. याबाबत आज राजपूत महामोर्चाच्या वतीने पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आले. शिवाय प्रत्येक पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून निवेदन देणार असल्याचे महामोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पद्मावती सिनेमाच्या माध्यमातून राजपूत समाजाचा चुकीचा इतिहास समोर आणला जात आहे. त्यामुळे या सिनेमात काटछाट करून चालणार नाही तर या सिनेमावरच बंदी आणा. तो प्रदर्शित होणार नाही याची जबाबदारी  सरकारने घ्यावी. जर सिनेमा प्रदर्शित झाला तर राजपूत समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान या बाबत सेन्सॉर बोर्ड बरोबर चर्चा केली जाईल तसेच काटेकोरपणे ऐतिहासिक संदर्भ बदलता कामा नयेत अशा सूचना सेन्सॉर मंडळाला दिल्या जातील असे आश्वासन पर्यटन मंत्री रावल यांनी महामोर्चाच्या शिष्ठमंडळाला दिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -