Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडाक्रिकेट खेळणं नोकरी करण्यासारखं झालं: अजित वाडेकर

क्रिकेट खेळणं नोकरी करण्यासारखं झालं: अजित वाडेकर

ajit wadekar,kolhapur,cricket,india cricket,job,cricket is like jobकोल्हापूर: क्रिकेट खेळणं म्हणजे सध्या नोकरी करण्यासारखं झालं आहे. जो फिट राहील तोच या नोकरीत टिकेल, अशी स्थिती आहे, असं मत भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी आज मांडलं.

येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर दिव्यांगाच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी वाडेकर कोल्हापुरात आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी क्रिकेटविषयी मते मांडली. अति क्रिकेटमध्ये खेळाडूंच्यावर ताण पडतो आहे का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी क्रिकेट खेळणे हे सध्या नोकरी आहे. जो फिट राहील तोच संघात टिकेल. तसेच खेळाडूंच्यात स्पर्धा निर्माण झाल्याने खेळाडू स्वत:च्या फिटनेसबरोबर खेळावर लक्ष केंद्रित करत आहेत,’ असं ते म्हणाले.
वाडेकर यांनी क्रिकेटमधील व्यावसायिकतेचे समर्थन केले. क्रिकेटमध्ये पैसा आल्याने खेळाडूला आर्थिक चणचण भासत नाहीत. तो क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकतो. टेस्ट, वनडे, टी-२०मध्ये खेळाडूंना चांगली रक्कम मिळतेय. आयपीएलमध्ये भारतीय संघाबरोबर ज्युनिअर खेळाडूंना चांगली संधी मिळत असून पैसे मिळत आहेत. त्यामुळं खेळाडू आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम झाला आहे, असंही ते म्हणाले.
भारताने पाकबरोबर क्रिकेट खेळावे का, असा प्रश्न वाडेकर यांना केला असता त्यांनी भारताने पाकबरोबर क्रिकेट खेळले पाहिजे असे मत व्यक्त केले. भारत पाकिस्तानपेक्षा सर्व बाबतीत वरचढ आहे. भारताने क्रिकेटबरोबर सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. हॉकी, कबड्डीसह सर्व खेळांत भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे. क्रिकेटमध्यही भारत अव्वल आहे. क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे हे मैदानावर दाखवण्यासाठी भारताने पाकबरोबर क्रिकेट खेळले पाहिजे. भारतीय मैदानावरच नव्हे तर पाकिस्तानमधील मैदानावरही भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ ठरेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
‘माझ्या काळातील क्रिकेटमध्ये पाकमध्ये खेळताना खेळाडू नव्हे, पंचही विरुद्ध असायचे. तरीही आम्ही खेळायचो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाडेकर म्हणाले, ट्वेंटी-२०, वनडे क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंचा कस लागतो. पाच दिवसांत खेळपट्टी, हवामान बदलत असते. त्यानुसार संघाला डावपेच बदलावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रतिस्पर्धी संघाबरोबर मुकाबला करत खेळाडूला खरे क्रिकेट दाखवण्याची संधी मिळते, असे मत व्यक्त केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments