Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रआमची युती ओवेसींच्या एमआयएमसोबत महाराष्ट्रातील नेत्याशी नाही – प्रकाश आंबेडकर

आमची युती ओवेसींच्या एमआयएमसोबत महाराष्ट्रातील नेत्याशी नाही – प्रकाश आंबेडकर

नागपूर : एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितला तलाक दिला तशी घोषणाही केली. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. “आमची एमआयएमसोबतची युती महाराष्ट्रातील नेत्याशी नाही, तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. ओवेसी सांगेपर्यंत युती कायम आहे”, अशी माहिती आंबेडकर यांनी नागपूर येथे पत्रकारी परिषदेत दिली.

वंचित बहुजन आघाडीत जागा वाटपावरून फूट पडली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने एमआयएमने वंचित आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. “२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे”, असे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे”, असे जलील म्हणाले होते. जलील यांच्या घोषणेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युती कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

इम्तियाज जलील यांच्या घोषणेनंतर आंबेडकर यांनी याविषयावर भाष्य केले. ते म्हणाले, “आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही. तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि आता ओवेसी यांच्याकडे निरोप घेऊन गेली आहेत”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या स्पष्टीकरणानंतर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील युतीचा गोंधळ आणखी वाढला असून, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments