सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलकांनी फोडल्या रक्ताच्या बाटल्या

- Advertisement -

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी प्रहार संघटनेकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून निषेध व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वीच जनहित शेतकरी संघटनेने सहकारमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. तेव्हापासून सुभाष देशमुख यांच्या निवास्थानाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही प्रहार संघटनेच्यावतीने सहकारमंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान शिबिराचे आयोजन करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आंदोलकांना थेट सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रुग्णवाहिकेत लपून देशमुख यांच्या निवास्थानापर्यंत पोहोचले. त्यानंतर रूग्णवाहिकेतून बाहेर पडत त्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकात जोरदार बाचाबाची झाली. आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल्या रक्ताचा सडा सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच पडला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते. अखेर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. अखेर तब्बल दोन तासानंतर पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. अतुल खूपसे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोरही आंदोलन करण्यात आले. आजपासून बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर तळ ठोकणार आहे. आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे. लोकमंगल साखर कारखाना शेतकरी संघटनेच्या रडारवर आहे. त्यामुळेच इथे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाल्याला १५ दिवस उलटूनही कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला नव्हता. त्यानंतर रयत क्रांती संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित शेतकरी संघटनेने एकत्र येत ऊसाला २ हजार ७०० रूपयांची पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मात्र, सुभाष देशमुख स्वत: खासगी कारखानदार असल्याने इतर कारखानदारांना फूस लावत असल्याचा आरोप जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केला होता.

- Advertisement -