Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्ररमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली शपथ

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली शपथ

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Maharashtra
Governor Ramesh Bainsमुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय

राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री. बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन १९८९ साली श्री. बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

सन १९८९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री. बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन २०१९ साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

Web Title: Ramesh Bains became 20th Governor of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments