Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात मान्यवरांच्या प्रतिक्रिया…

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात मान्यवरांच्या प्रतिक्रिया…

निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल- मुख्यमंत्री
कोपर्डी प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  आपण त्या तरूणीला परत आणू शकत नाही, पण या निकालाने तिच्या आत्म्याला शांती मिळेल ,फाशीच्या या शिक्षेमुळे नराधम यापुढे असं कृत्य करणार नाहीत. सरकारी वकील उज्वल निकम आणि सर्व चौकशी अधिका-यांचं अभिनंदन करतो, अनेक अडचणींवर आणि खटल्याला उशीर करण्याचा प्रयत्न होत असतानाही या खटल्याचा रेकॉर्ड वेळेत निकाल लागल्याबद्दल मी अभिनंदन करतो.

कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः खा. अशोक चव्हाण
कोपर्डी प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा आहे. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल अशी अपेक्षा आहे.

वरिष्ठ न्यायालयात हा निकाल कायम राहील आणि आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहील याची जबाबदारी सरकारची आहे. यासोबत महिलांवरील अत्याचाराबाबतच्या इतर खटल्यातही जलदगतीने न्याय मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असेही म्हणाले.

पीडित मुलीला न्याय मिळाला विजया रहाटकर, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग 

अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही  आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

निकाल समजल्यानंतर रहाटकर म्हणाल्या कि, या निर्णयाने त्या भगिनीला न्याय मिळाला आहे. तिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे. या निर्णयाने कायद्याचे भय निर्माण झाल्याने यापुढे कुणीही असा अत्याचार करण्यास धजावणार नाही. कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला, तिच्या कुटुंबीयांना जलद न्याय मिळवून दिला आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहील यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल, अशी खात्री ही त्यांनी व्यक्त केली.

तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल- धनंजय मुंडे
कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल आणि हा निकाल उच्च न्यायालयात कायम राहील ही जबाबदारी राज्य शासनाची आहे, अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन या पुढे अशा घटनांना पायबंद बसेल. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे. हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत. या निकालासाठी प्रयत्न करणा-या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो असं मुंडे म्हणाले.

आमच्या पीडित भगिनीला अखेर न्याय मिळाला–  सुप्रीया सुळे,खासदार

कोपर्डीच्या आमच्या पीडित भगिनीला अखेर न्याय मिळाला याचे आंतरिक समाधान आहे. माननीय न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे या वृत्तींना धरबंद बसेल अशी अपेक्षा आहे, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करते. 

असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळालानीलम गो-हे, शिवसेना उपनेत्या

या निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे.

त्या नराधामांना अरब देशात जशी शिक्षा देतात तशी दया… आमदार इम्तियाज जलिल

कोपर्डी प्रकरणातील त्य़ा नराधामांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे जनतेच्या न्यायव्यस्थेवरील विश्वास वाढला. परंतु बल्ताकारातील आरोपींना सौदी अरेबियामध्ये भर चौकात फासावर लटकवतात तसे त्यांना लटकवले पाहिजे. तर असे प्रकार करण्यास कुणी धजावणार नाही.

नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी-अजित पवार

अखेर कोपर्डी प्रकरणातील त्या नराधामांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे. कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत सर्व महिलांना आता शांततेनं आणि समाधानाने समाजात वावता येणार आहे.  त्यामुळे खरंच या निर्णयामुळे सगळ्याच महिलांचा विजय झाला आहे. असं निर्घृण कृत्य करण्याऱ्यांवरही जबर बसेल असा विश्वास व्यक्त केलाय. तसंच दोषी हे पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा आणि फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबाजवणी करावी अशी मागणी पवारांनी केली.

कोपर्डीतील निर्भयाच्या कुटूंबियांना न्याय मिळाला- अॅड.चारुलता टोकस, अध्यक्षा प्रदेश महिला काँग्रेस 

कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून आरोपींना मिळालेल्या कठोर शिक्षेमुळे निर्भयाच्या कुटूंबियांना आज न्याय मिळाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण समाजमन हेलावून गेले होते. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाले होते. त्यामुळे या घटनेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजच्या निकालामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झाल्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना मोठी जरब बसेल. आरोपींना झालेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयात कायम रहावी यासाठी सरकारने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. कोपर्डीच्या घटनेप्रमाणे इतर महिला अत्याचाराच्या खटल्यांची सुनावणी जलद होईल आणि दोषींना कठोर शिक्षा होईल यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे टोकस म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments