Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्माने घेतली मागे

धनंजय मुंडेंच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्माने घेतली मागे

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकले  होते. मात्र,बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल(दि.२१) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता.

रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसवर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशीही चर्चा होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “या प्रकरणी पहिल्यापासूनच भाजपची याबाबतची भूमिका स्पष्ट होती. एक चुकीचं उदाहरण आम्ही महाराष्ट्रात सेट होऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली होती आणि त्यातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला होता.

“पण, संबंधित महिलेनं बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसीअंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर तत्काळ कारवाई करावी.”

काय आहे प्रकरण

धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. 11 जानेवारी 2021 रोजी या महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं.

या ट्वीटसोबत या महिलेनं म्हटलं, “मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही.”

तसंच, या महिलेनं आणि तिच्या वकिलानं माध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी कथित पीडित महिलेने सांगितलं, “धनंजय मुंडे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. त्यांना मी 1996 पासून ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी मी 16-17 वर्षांची असेन. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते मंत्री आता आहेत. 1998 साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदौरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना माझ्यावर बलात्कार केला.”

धनंजय मुंडेचं म्हणाले

सोशल मीडियावर या प्रकरणानं चांगलाच धोर धरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुढे येत एक पोस्ट लिहून महिलेचे आरोप फेटाळले होते.

या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी यावेळी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments