Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही : शरद पवार

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही : शरद पवार

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले म्हणून त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

]“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“पोलीस विभाग चौकशी करेल. आमचं हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.

“मी काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं”, असं मत त्यांनी मांडलं.

“भाजपच्या एका नेत्याचं स्टेटमेंट दिलं. काळजीपूर्वक चौकशी करावी असं त्यांनी सांगितलं. लगेच राजीनामा घेऊ नये, असं त्यांनी म्हटलं. ते राज्याचे माजी प्रमुख होते. भाजपच्या माजी आमदाराने त्यांच्यावर आरोप झाल्याचं म्हटलं. काही भाजप नेते आरोप करत आहेत. त्यांना टीका करायची असेल तर त्याबाबत आमचं काही म्हणणं नाही. आमचं म्हणणं फक्त वस्तुस्थिती पुढे यावी, असं आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“भाजप नेते हेगडे आणि मनसे नेते धुरी ही एक-दोन उदाहरण आली नसती तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणं आल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलीस तपास करतील. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

“गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

“शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टीही झाल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत”, असा टोला त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments