Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र'शिवसेना याच वर्षी सत्तेला लाथ मारणार'

‘शिवसेना याच वर्षी सत्तेला लाथ मारणार’

अहमदनगर: कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की तेथील नागरिक विविध मागण्यांची निवेदने देतात. समाजातील कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. शिवसेना सत्तेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यावर्षी ​ कदाचित सत्तेला लाथ मारू, असे सूतोवाच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अहमदनगरमध्ये केले. सत्तेतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावेडीत ठाकरे यांचा रोड शो आणि सभा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, भाजपवर नाव न घेता टीका केली. ‘गुजरातमधील सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसतात. तसे शिवसेनेच्या कोणत्याही सभेत होत नाही,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला. शिवसेना विरोधी पक्षात नाही, पण सत्तेत पहारेकरी म्हणून काम करते. चांगल्या कामांचे कौतुक करतो, पण चुकीच्या कामांना रोखण्याचे काम केले जाते, असेही ते म्हणाले. विद्यार्थी, महिला, व्यापारी कोणीही सत्ताधाऱ्यांवर खूश नाही. नोटाबंदीच्या काळात एकही श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर दिसली नाही. काळा पैसा बाहेर निघाला नाही, पण महिलांनी बचत करून ठेवलेले पैसे काळे धन म्हणून दाखवले गेले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी आहे, पण कर्जमाफीही धड दिली जात नाही, त्यामुळे याच वर्षी शिवसेना सत्तेला लाथ मारणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात सत्ता सेनेचीच येणार, असा दावाही केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेकडून ११ लाखांची मदत केली. शहर उपनेते अनिल राठोड यांनी मदतीचा धनादेश आदित्य ठाकरेंकडे दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments