नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला शिवसेनेचा खोडा!

- Advertisement -

मुंबई – काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा आशयाचा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना पोहोचवला आहे. अशी माहिती समोर येत आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र राणेंचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अद्याप अडलेला आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह बैठका झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे.  याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनुकूलता दर्शवली होती.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हातील नारायण राणेंचे विरोधक आणि गृह,अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी केली होती.  आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुस्तीही त्यांनी याला जोडली. राणे यांच्या मंत्रीपदासाठी शिवसेनेचा खोडा आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -
- Advertisement -