Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना-वंचित युती: मुंबई महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यास सेनेला मदत होणार?

शिवसेना-वंचित युती: मुंबई महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यास सेनेला मदत होणार?

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली.

Uddhav Thackeray
Prakash Ambedkar
Shiv Sena
Vanchit Bahujan aaghadi

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख आणि प्रभावशाली शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शिवशक्ती’ आणि ‘भीमशक्ती’ राज्यात पुन्हा एकदा एकत्र आली आहे. सोमवारी मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची घोषणा केली.

ब्रुहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर नागरी संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी युतीची घोषणा झाली आहे.

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आम्ही आमच्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ.”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही जी चळवळ सुरु केली. त्याला आमच्याच मित्र पक्षांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना बाजूला सारून चळवळ सुरु ठेवली. प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करण्याचा विश्वास असलेल्यांना आम्ही पाठिंबा देऊ. ”

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचा इतिहास युतीबद्दल फार वेगळा आहे. त्यांनी यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम सोबत युती केली होती.

मुंबई माणूस‘ ने या नव्या युतीबद्दल काही शिवसेना (उबाठा) नेत्यांशी संवाद साधुन त्यांची मते जाणून घेतली.

शिवसेनेचे (उबाठा) आमदार अरविंद सावंत यांनी सांगितले, “मुंबई आणि महाराष्ट्रातील दलित समाजाला आमच्यासोबत सामावून घेणे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरेल.”

“भाजपने स्वतः राष्ट्रीय जनता दल आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी सोबत युती केली होती, मग ते आमच्या युतीबद्दल का बोलत आहेत? प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर विश्वास आहे म्हणून ते आमच्यासोबत येण्यास तयार झाले आहेत.” असे ते पुढे म्हणाले.

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले, “दोन्ही नेते अनुभवी आहेत. ही युती दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते सक्षम आहेत. या युतीसह आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच यशस्वी होऊ.”

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्राचे तुकडे होण्यापासून वाचवण्यासाठी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले आहेत.

 

Web Title: Shivsena-Vanchit Yuti: Mumbai mahanagarpalika punha kaabij karnyas senela madat honar?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments