स्वारगेट एसटी डेपोत २०० खासगी बसेसने तणाव

- Advertisement -

पुणे: वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्यानंतर प्रवाशांची कोंडी झाली. एसटी अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी २०० खासगी बसेस प्राचारण केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

कर्मचारी संघटना आणि एसटी प्रशासन आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत या वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, त्यामुळे राज्यभरात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. कर्मचारी संघटनांना अद्दल घडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एसटीच्या प्रवाशांसाठी आता थेट खासगी बस रस्त्यावर उतरवल्या आहेत. यामुळे काही काळ एसटी कर्मचारी आणि प्रशासनात वाद निर्माण झाले होते. मात्र, प्रवाशांची सोय झाल्याने आता ठिकठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

काही वेळापूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०० खासगी बस आणल्या. मात्र, संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी या बस आगारातून बाहेर काढल्या. पुण्यात एसटी सेवेअभावी प्रवाशांचे खूप हाल होत होते. शिवाजी नगर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळेच एसटी ऐवजी खासगी बस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, यामुळे स्वारगेट डेपोत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने आतापर्यंत २०१८ खाजगी बसेस सोडल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -