मृतदेह जिवंत करण्यासाठी दहा दिवस ठेवला चर्चमध्ये!

- Advertisement -

ठाणे – मुंबईतील भायखळा येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह तब्बल १० दिवसांपासून अंधश्रद्धेपोटी प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला नागपाडा येथील चर्चमध्ये तर नंतर शनिवारी मृतदेह अंबरनाथ मधील एका चर्चमध्ये ठेवण्यात आला होता.

मशक ऑक्टोविवो नेविश (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भायखळा परिसरात राहणारा होता. त्याचा २७ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह मुंबईतील नागपाडा येथील एका चर्चमध्ये आणून त्याला जिवंत करण्यासाठी चर्चचे फादर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रार्थनेच्या माध्यमातून प्रयत्न केला. मात्र येथील चर्चमध्ये प्रार्थना करूनही मृत मशक जिवंत झाला नाही. तसेच येथे प्रार्थनेसाठी येणाऱ्या नागरिकांना हा प्रकार समजल्याने त्यांनी त्याचा मृतदेह शनिवारी अंबरनाथच्या एका चर्चमध्ये ठेवून तेथेही असाच प्रकार केला. अंधश्रद्धेची धक्कादायक व तितकीच गंभीर स्वरुपातील घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी फादर आणि त्याच्या नातेवाईकांना समज देत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

दरम्यान मृत मशकचा मुंबईतील एका सरकारी रुग्णालयामध्ये कर्करोगामुळे २७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकाराबाबत मृत मशकच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. याप्रकरणी अंबरनाथ आणि नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -