Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रहुकुमशाही करणारा कधीच शेवटपर्यंत टिकला नाही, त्याला जावंच लागतं- अजित पवार

हुकुमशाही करणारा कधीच शेवटपर्यंत टिकला नाही, त्याला जावंच लागतं- अजित पवार

माणगाव ( रायगड )– सध्या सरकारची हुकुमशाही सुरु आहे. सद्दामचीही आणि हिटलरचीही हुकुमशाही जास्त काळ नाही टिकली. तुम्ही जगाचा इतिहास काढा. हुकुमशाही करणारा कुणीही शेवटपर्यंत टिकला नाही शेवटी त्याला जावं लागलं. शेवटी ही डेमोक्रोसी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हा-आम्हाला एकच समानतेचा जो अधिकार दिला आहे. तो महत्वाचा आहे. त्यालाच कुठंतरी धुडकावण्याचं काम सरकारची ही मंडळी करताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी माणगावमधील जाहीर सभेत केला.

गेली साडेतीन वर्ष हे सरकार विकासाची टिमकी वाजवत आहात. मग विकास का दिसत नाही, काम का दिसत नाही, का रस्ते दिसत नाहीत. वीजेच्या प्रश्नी पश्चिम महाराष्ट्र, कोकणाकडे या सरकारने दुर्लक्ष केला आहे. वीजेची कनेक्शने देणं बंद केली आहेत. का तिथे माणसं रहात नाही. एका बाजुला एक न्याय आणि दुसऱ्या बाजुला दुसरा न्याय अशी भूमिका पंधरा वर्ष सत्तेमध्ये असताना आम्ही घेतली नाही. परंतु भाजप-सेनेचे सरकार असताना मात्र कोकणवर अन्याय होत आहे. आमच्या काळात कोकणाला झुकतं माफ दिलं होतं.आज धरणाची बरीच कामे ठप्प झाली आहेत. आम्ही कृषी संजीवनी योजना आणली. का तर शेतकऱ्यांना मदत होईल परंतु यांनी काय आणलं माहितीय. दहा शेतकऱ्यांपैकी पाच शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि त्यातील पाच शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही तर वीज कनेक्शन नाही असा भेदभाव का ?असा सवालही अजित पवार यांनी सरकारला विचारला. आता तर मराठवाडयामध्ये खोटी वीज बिले आली आहेत.पैसे कमी करुन देतो असे आता सांगत आहेत. आज मला एक चिठ्ठी आली की, शासकीय मदतीचा दिलेला चेक बाऊन्स झाला आणि त्या शेतकऱ्यालाच बॅंकेने दंड ठोठावला आहे. त्या शेतकऱ्याचा काय दोष यामध्ये. सरकारने मोठा गाजावाजा करुन केंद्रसरकारच्या सामाजिक व अर्थसहाय्य योजनेतंर्गत दिपक इंगळे यांचे वीजेच्या धक्क्यांने १४ मार्च २०१७ रोजी निधन झाले. त्यांना २० हजार रुपये अर्थसहाय्य केले. त्यांच्या पत्नीने तो बॅंकेत तीनवेळा भरला परंतु तो चेक बॅंकेत बाऊन्स झाला.हे शासन फक्त गाजावाजा करत आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे असेही अजित पवार म्हणाले.

कर्जमाफीची योग्यवेळ कधी येणार. तुम्ही रेकॉर्ड काढा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या भाजप-सेना सरकारच्या काळात झाल्या आहेत. मला भेदभाव करायचा नाही आमचं सरकार आणि त्यांचं सरकार.पण मला माझा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं वाटतं.माझा शेतकरी अडचणीत येता कामा नये. अजुनही शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. मी यावर मुख्यमंत्र्यांना विचारले तर त्यांनी काम सिस्टमॅटिक पध्दतीने सुरु आहे असं सांगितले. असले काय इग्लिंश शब्द काढतात की काही विचारु नका. काही नाही लोकांचा फक्त भुलभुलैय्या चालला आहे. फक्त जाहिरातबाजी, नुसतं मार्केटिंग सुरु आहे आणि फक्त बाबांचा फोटो बघायचा. सरकार शेतकऱ्यांच्या भल्याचा कोणताही निर्णय घेत नाहीय. हे अजब यांचं सरकार अशी टिकाही अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी अनेक मुदयांना आपल्या भाषणामध्ये हात घातला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या कामाचा उल्लेख करतानाच त्यांचं कौतुकही केलं. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचेही भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणामध्ये आज राज्यातल केवळ घोषणाबाजी सुरु आहे.धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. शाहु,फुले,आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सामाजिक तणाव निर्माण केला जात आहे अशावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे असेही तटकरे म्हणाले. लोकांना जाती-धर्माच्या नावावरुन राजकारण करणारे लोक नको आहेत.सत्ता असो किंवा नसो लोकांच्या बाजूने निर्णय घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केला आहे. आदरणीय पवार साहेबांनी नेहमी कोकणचा विचार केला आहे. त्यांनी कोकणाला खुप काही दिले आहे. परंतु आजचे सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.कार्यक्रमामध्ये जिल्हापरिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनीही आपले विचार मांडले. माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमीपूजन माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज झाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,आमदार अनिल तटकरे,जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर,युवा नेते अनिकेत तटकरे,माणगाव नगराध्यक्ष आनंद यादव,उपनगराध्यक्षा निलम मेहता आदींसह माणगाव जिल्हयातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments