Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रलघुशंकसेसाठी रुळावर उतरलेली महिला लोकलच्या धडकेत ठार!

लघुशंकसेसाठी रुळावर उतरलेली महिला लोकलच्या धडकेत ठार!

कल्याण: लघुशंकेसाठी रेल्वे रुळावर उतरलेल्या महिलेचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात घडली. यानंतर या घटनेला रेल्वे प्रशासनाची उदासीनता जबाबदार असल्याचं समोर आलंय. सीताबाई सोळंके असं या महिलेचं नाव असून त्या मूळच्या परभणीच्या होत्या. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मुलीच्या उपचारासाठी त्या नातेवाईकांसोबत देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आल्या होत्या. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर गाडी थांबल्यानंतर त्या लघुशंकेला जाण्यासाठी डब्यातल्या प्रसाधनगृहाजवळ आल्या, मात्र तिथे गर्दी असल्यानं त्या खाली उतरल्या आणि थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या रेल्वे रुळात लघुशंकेसाठी उतरल्या.
मात्र याचवेळी ६ वाजून २३ मिनिटांची बदलापूर लोकल कल्याण स्थानकात प्रवेश करत होती, या लोकलने त्यांना धडक दिली आणि त्या लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकून बसल्या. सुमारे तासभर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मृतदेहच हाती लागला.
दरम्यान, या घटनेनं रेल्वेचा तासभर खोळंबा झाल्यानं रेल्वेनं लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या उद्घोषणा सर्व स्टेशन्सवर सुरू केल्या, मात्र नंतर अपघातामुळे हा खोळंबा झाल्याचं समोर आलं आणि रेल्वेचं बिंग फुटलं. रेल्वेनं अशा खोट्या उद्घोषणा का केल्या? याचं कारण शोधण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात गेल्यानंतर तिथे समोरच्या बाजूला महिलांसाठी प्रसाधनगृहच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
त्यामुळं प्रथमदर्शनी जरी चूक सीताबाई सोळंके यांची वाटत असली, तरी या अपघाताला आणि त्यानंतर झालेल्या रेल्वेच्या खोळंब्याला रेल्वे प्रशासनाची उदासीनताच जबाबदार असल्याचं समोर आलंय. त्यामुळं आता रेल्वे प्रशासन ही चूक सुधारण्याकडे लक्ष देते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments