Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी सिनेमा आणि सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार-महसूल मंत्री बाळासाहेब...

मराठी सिनेमा आणि सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Shiv Sena, Congress-NCP will fight this election together Balasaheb Thoratमुंबई: काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

            महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप सत्रात महसूल मंत्री श्री थोरात यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख,सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, यांच्यासह अशोक राणे, नानू जयसिंघानी, वर्षा उसगावकर, अमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

            महसूल मंत्री श्री थोरात म्हणाले की, आज मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे. तीन दिवस सादर करण्यात आलेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण ठरवताना या चर्चासत्रातील सूचनांचा विचार केला जाईल. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील, असा विश्वास श्री. थोरात यांनी  यावेळी व्यक्त केला.

            मराठी सिनेमा, कला,नाट्य  आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि  हिंदी सिनेमाबरोबर आज मराठी सिनेमा स्पर्धा करीत असतो.  मराठी सिनेमा निर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपण वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात, याकरिता राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असेही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख  म्हणाले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आल्या तरी सांस्कृतिक कार्य विभाग या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील. कला क्षेत्रातील सर्वच दिग्गजांना शासन जलद गतीने सर्वतोपरी मदत करेल. येत्या काळात राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील साऱ्या कलांना वाव कसा देता येईल, मराठी चित्रपट,नाट्य,मनोरंजन लोककला आदींचे भवितव्य कसे उज्ज्वल करता येईल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. राज्यातील सांस्कृतिक कलांचे भवितव्य कसे असेल यासाठी या चर्चासत्राच्या माध्यमातून एक ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. या अनुषंगाने प्रस्तावित चित्रपट, मनोरंजन व माध्यम धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवस चालणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज संपन्न  होणाऱ्या चर्चासत्रातून येणाऱ्या सूचनांच्या आधारे येणाऱ्या काळात या कला क्षेत्राला  चांगला आकार देण्याचा प्रयत्न राहील.महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने या चर्चा सत्रातील सूचनांच्या आधारे धोरणाबाबतचा मसुदा तयार करावा. हा मसुदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडून, चर्चा करून त्यांच्या सूचनांसह या क्षेत्राला उभारी देऊ, असा विश्वास श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments