टोईंगच्या घोटाळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याचे लागेबांधे: निरुपम

- Advertisement -

महत्वाचे…
१.प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली २. टोईंगचा दंड १५० वरुन ६६० का करण्यात आला? दर टोईंगमागे ४०० रुपये या एजन्सीला मिळतात ३. आयएएस प्रवीण दराडे आणि विदर्भ इन्फोटेक यांचे मुख्यमंत्र्यांचे जवळचे संबंध


मुंबई : मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्याशी संबंधित असलेल्या विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

“प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला अधिक फायदा होत गेला.”, असा आरोप निरुपम यांनी केला. “टोईंग कंपन्या बेदरकारपणे गाड्या टोईंग करत आहेत. मुंबईतील वाहन टोईंग करण्याचं काम नागपूरस्थित विदर्भ इन्फोटेक कंपनीला मिळालं आहे. टोईंगचा दंड १५० वरुन ६६० का करण्यात आला? दर टोईंगमागे ४०० रुपये या एजन्सीला मिळतात.”, असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला.

- Advertisement -

“विदर्भ इन्फोटेक कॉम्प्युटर सोल्युशन कंपनी आहे. त्यांना टोईंगच्या कामाचा अनुभव नाही. विदर्भ इन्फोटेक कंपनीला कामाचा अनुभव नसताना टोईंगचं काम का देण्यात आलं? विदर्भ इन्फोटेकला वरळीत आरटीओ कार्यालयात १ हजार स्केअर फुटांचं कार्यालय फुकट का दिले?” असा सवाल करत निरुपमांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचीही मुख्यमंत्र्यांकडे केली.

“प्रवीण दराडे आणि विदर्भ इन्फोटेक यांचे जवळचे संबंध आहेत. दराडे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. प्रवीण दराडे मुख्यमंत्र्यांसाठी इतके प्रिय आहेत की ते पहिले आएएस अधिकारी आहेत ज्यांना मलबार हिल येथील एक बंगला सेवानिवृत्तीपर्यंत देण्यात आला आहे.” असाही गंभीर आरोप निरुपम यांनी केला.

- Advertisement -