दोनशे शेतकऱ्यांना जेवणातून विषबाधा, एकाचा मृत्यू

- Advertisement -

नाशिक – दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे जवळपास २०० शेतकऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. तर, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बायर सिड्स या कंपनीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी बुधवारी आयोजित केलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली. सर्व विषबाधीतांना उपचारासाठी दिंडोरी येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

उमराळे बुद्रुक येथे रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सिड्स कंपनीने संकरित टोमॅटो पिक-पहाणी व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला होता. या चर्चासत्रानंतर दुपारी १ वाजता उपस्थित सुमारे २०० शेतकऱ्यांनी जेवण केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये अतुल केदार (वय ४१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर रात्री उशिरा आणखी काही शेतकऱ्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात ४० तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ विषबाधीत शेतकरी उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर दिंडोरी व नाशिक येथील विविध खाजगी दवाखान्यांत सुमारे ५० हून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांनी शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या व रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरसाठ व सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडवी यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -