Friday, March 29, 2024
Homeविदर्भभंडारागोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा

गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडुंचा आंदोलनाचा इशारा

भंडारा : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी मूळ किंमतीच्या शंभरपट खर्च होऊनही प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न कायम आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या वतीने धरणाच्या राजीव टेकडी परिसरात आंदोलन केले जाणार आहे. २५ जानेवारी रोजी होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू करतील.

पवनी तालुक्‍यातील गोसेखुर्द येथील राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामास सुमारे तीस वर्षांपूर्वी सुरवात झाली. तेव्हापासून आजवर अनेकांना हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा होती. परंतू प्रकल्प पूर्ण झालाच नाही त्यामुळे सिंचनाचे स्वप्नही भंगले.

या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांना देखील प्रकल्पासोबतच वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला म्हणून २ लाख ९० हजार रुपये देण्यात यावे, बेरोजगार तरुणांना २५ लाखांपर्यंत मुद्रा कर्ज मिळावे या प्रमुख मागण्या आहेत .

याशिवाय बुडीत क्षेत्राचे चुकीचे सर्व्हेक्षण झाल्याने संपादीत न केलेल्या जमिनी आणि वहिवाटीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अशा १०० गावांचे संपादन आणि पुर्नवसन कारवाई तात्काळ करावी, आपसी वादाने आर्थिक मोबदला उचल न केलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हिश्‍याप्रमाणे आर्थिक मोबदला विभक्‍त करुन देण्याची तत्काळ कारवाई करावी याबाबतही प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत .

तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा विभागीय आयुक्‍त यांच्या २० ऑक्‍टोबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार स्थापित समितीच्या प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींना भत्ते आणि ओळखत्र मिळावे, त्यांच्या रास्त शिफारसीनुसार पुर्नवसन आणि भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा मागण्या आहेत.

या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. २४ जानेवारीपर्यंत यावर निर्णय न झाल्यास २५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर एजाज अली, मंगेश वंजारी, विवेक माथूरकर, शिवशंकर माटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments