Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भभंडाराभंडारा दुर्घटना : उध्दव ठाकरेंची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट,म्हणाले...

भंडारा दुर्घटना : उध्दव ठाकरेंची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट,म्हणाले…

भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला आणि काही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी विधासभा अध्यक्ष नाना पटोले, भंडा-याचे पालकमंत्री ना.विश्वजीत कदम,मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे होते. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, कुटुंबियांचे केले सांत्वन… 

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा येथे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगडाले यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण

पहाटे दोनच्या सुमारास आग लागली तेव्हा बालकांच्या अतिदक्षता कक्षात दोन परिचारिका होत्या. परंतु त्या गाढ झोपेत होत्या. आग भडकल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत कक्षाबाहेर धाव घेतली.

आगीचे लोळ आणि धूर पाहून रुग्णालयाबाहेरील नागरिकही मदतीला धावले. परंतू तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. दहा कोवळे जीव होरपळून आणि गुदमरून गतप्राण झाले होते. काही बालके पूर्णपणे होरपळली होती. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments