Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeविदर्भगोंदियाप्रशासकीय इमारतीमुळे एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

प्रशासकीय इमारतीमुळे एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार – पालकमंत्री डॉ.परिणय फुके

गोंदिया : गोंदिया शहराच्या हृदयस्थानी भव्य अशी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापुर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे. त्यामुळे लोकांची कामानिमीत्त होणारी पायपीट थांबून लोकांचा वेळ, पैसा व श्रम वाचण्यास देखील मदत झाली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे लोकांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.

गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार संजय पुराम व विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे व जि.प.पशु संवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ.फुके म्हणाले, प्रशासकीय इमारतीची शहरात भाड्याने विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयाला आवश्यकता होती. त्यांची ही गरज सुसज्ज अशा या इमारतीतून पूर्ण झाली आहे. इमारत बांधणे सोपे आहे, परंतू इमारतीची देखभाल करणे तितकेच कठीण काम आहे. या इमारतीत २८ विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या इमारतीत अग्निशमन यंत्र बसविले आहेत. विविध साहित्य कार्यालयांना उपलब्ध करून देण्यासोबतच फर्निचर देखील एकसारखे बसविले आहे. या इमारतीच्या परिसरात ६ दुकाने तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक दुकान महिला बचतगटासाठी राखीव ठेवण्यात यावे, त्यामुळे बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करणे सोईचे होईल. दुसरे दुकान दिव्यांग बांधवांना उपलब्ध करुन द्यावे, तेथे एखादे झेरॉक्स सेंटर सुरु करुन त्याला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमगाव व सालेकसा तहसील कार्यालय इमारतीचे काम पुर्णत्वास आले असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल.

अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार श्री.बडोले म्हणाले, बऱ्याच दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या गोंदियाचे वैभव असलेली ही नवीन प्रशासकीय इमारत आजच्या लोकार्पणामुळे नागरिकांच्या सेवेत आली आहे. या इमारतीमुळे विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे नागरिकांना त्यांची कामे करणे सोईचे होणार आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासन निर्णयानुसार गोंदिया शहरातील सिंधी बांधवांना सत्ता प्रकार-अ या आखिव पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी आमदार हेमंत पटले व रमेश कुथे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी तर संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments